अमरिंदरसिंगांचा राजीनामा! सध्या आमदारही नसलेला नेता होणार मुख्यमंत्री?

पंजाबमध्ये मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांना हटवले गेलेआहे. त्यांनी राजीनामा दिला आहे.
sunil jakhar may replace chief minister amarinder singh in punjab
sunil jakhar may replace chief minister amarinder singh in punjab

नवी दिल्ली : पंजाबमध्ये (Punjab) मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांना हटवण्यात आले आहे. त्यांनी राजीनामा दिला असून, नवीन मुख्यमंत्री निवडीसाठी काँग्रेस (Congress) हाय कमांडने तातडीने आज सायंकाळी आमदारांची बैठक बोलावली आहे. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत माजी प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड (Sunil Jakhar) यांचे नाव आघाडीवर आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.  

अमरिंदरसिंग यांच्या जागी कोण, अशी चर्चा सुरू झाली आहे. यात माजी प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड, प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू, प्रतापसिंग बाजवा, अंबिका सोनी आणि राजकुमार वेर्का यांच्या समावेश आहे. यातील सुनील जाखड यांचे नाव आघाडीवर असल्याचे मानले जात आहे. सिद्धू यांना प्रदेशाध्यक्षपद देण्यासाठी जाखड यांना त्यावर पाणी सोडावे लागले होते. ते सध्या आमदार नाहीत. त्यांनी तीनवेळा अबोहार मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले असून, पंजाब विधानसभेत ते 2012-2017 या काळात विरोधी पक्षनेते होते. यानंतर 2017 मध्ये ते गुरदासपूरमधून लोकसभेवर निवडून गेले होते. मागील 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार अभिनेते सनी देओल यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता. 

जाखड यांचे गांधी कुटुंबांशी अतिशय जवळचे संबंध आहेत. ते अतिशय संयमी आणि शांत स्वभावाचे आहेत. पंजाब काँग्रेसमधील अंतर्गत वाद पाहता संयमी आणि शांत चेहऱ्याला पक्ष नेतृत्व पसंती देईल, असे दिसते. त्यामुळे जाखड यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. सध्या आमदार नसून, त्यांना पुन्हा विधानसभेवर निवडून यावे लागेल, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

याचबरोबर विद्यमान प्रदेशाध्यक्ष नवजोतसिंग सिद्धू यांचे नाव चर्चेत आहे. सिद्धू यांच्यापासूनच काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष सुरू झाल्याने त्यांना नेतृत्व कितपत पसंती देते, याबद्दल साशंकता आहे. त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद असल्याने मुख्यमंत्रिपद त्यांच्याकडे जाणार नाही, अशी शक्यता व्यक्त होत आहे. 

प्रतापसिंग बाजवा, राजकुमार वेर्का आणि अंबिका सोनी यांचीही नावे चर्चेत आहेत. बाजवा हे राज्यसभा खासदार असून, अमरिंदरसिंग यांचे कट्टर विरोधक आहेत. अंबिका सोनी याही खासदार असून, त्यांचे गांधी कुटुंबाशी जवळचे संबंध आहेत. त्यांना केंद्रातील मंत्रिपदाचाही अनुभव आहे. राजकुमार वेर्का हे आमदार असून, ते काँग्रेसचा दलित चेहरा आहेत. काँग्रेसकडून वेर्का यांनी संधी देऊन निवडणुकीआधी धक्कातंत्र अवलंबले जाऊ शकते, असे सूत्रांनी स्पष्ट केले. 

पक्षाच्या तातडीच्या बैठकीबाबत पंजाब काँग्रेसचे प्रभारी हरीश रावत यांनी  ट्विट केले आहे. पक्षाच्या अनेक आमदारांनी तातडीने बैठक बोलावण्याची मागणी केली होती. यानुसार आज सायंकाळी ही बैठक होत आहे. पंजाब प्रदेश काँग्रेस कमिटीने ही सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला सर्व आमदारांनी उपस्थित राहावे, असे त्यांनी म्हटले आहे. काँग्रेसने अचानक बैठक बोलावल्याने राज्यात मुख्यमंत्री बदल होणार असल्याचे स्पष्ट झाले. 

मुख्यमंत्री अमरिंदरसिंग आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात मागील 2017 च्या विधानसभा निवडणुकीपासून वाद सुरू आहे. भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेल्या सिद्धू यांनी काँग्रेसच्या विजयानंतर पंजाबमध्ये उपमुख्यमंत्रिपद मिळेल, अशी शक्यता होती. परंतु, मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी याला विरोध केल्याने सिद्धू यांना दुसरे मंत्रालय देण्यात आले होते. तेव्हापासून दोघांचा वाद सुरू असून, सिद्धू यांनी उघड बंड पुकारले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com