सुएझमध्ये अडकलेले जहाज पाचव्या दिवशीही जागेवरुन हललेच नाही; जहाजावरील सर्व कर्मचारी भारतीय

सुएझ कालव्यात अडकलेले एव्हर गिव्हन मालवाहू जहाज आजही हलवण्यात यश आलेले नाही.
suez canal remains blocked by container ship Ever Given
suez canal remains blocked by container ship Ever Given

नवी दिल्ली : सुएझ कालव्यात अडकलेले एव्हर गिव्हन मालवाहू जहाज आज पाचव्या दिवशीही हलवण्यात यश आले नाही. समुद्रातील भरतीचा फायदा घेत जहाजाला बाजूला करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या जहाजातील सर्व २५ कर्मचारी सुरक्षित असून, ते सर्वजण भारतातील आहेत. या अडकलेल्या जहाजामुळे भारत आणि चीनकडे जाणारी सुमारे १६ तेलवाहू जहाज अडकली आहेत. 

याबाबत जपानमधील कंपनीच्या मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत शोई किसेन कंपनीचे अध्यक्ष युकितो हिगाकी यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, जहाजाची स्थिती बदलण्यासाठी दहा टगबोटचा वापर करण्यात येत आहे. जहाज अडकलेल्या ठिकाणी किनारा खोदण्याचे काम वेगाने सुरू आहे. भरती आली तर त्याच्या मदतीने जहाज बाजूला करता येईल, या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. 

जहाज अडकल्यामुळे सुवेझ कालव्यात मोठ्या प्रमाणात जलवाहतुकीची कोंडी झाल्याबद्दल हिगाकी यांनी दिलगिरी व्यक्त केली. कंपनीच्या निवेदनात म्हटले की, मालवाहू जहाजावरील वजन कमी करण्यासाठी त्यावरील कंटेनर उतरवण्याचे काम सुरू आहे. हे खरोखरच कठीण काम आहे. सध्या सुरू असलेले प्रयत्न अपयशी ठरल्यास अन्य पर्यांयाचा विचार करण्यात येईल. 

अडकलेल्या जहाजाला काढण्यासाठी नेदरलँडची कंपनी बॉस्केल्सचे कर्मचारीही सुवेझ कालवा प्राधिकरणाबरोबर घटनास्थळी काम करत आहे. इजिप्तच्या अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांना घटनास्थळी येण्यास मज्जाव केला आहे. सुवेझ कालवा प्राधिकरणाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल ओसामा राबेई म्हणाले की, हे खूपच गुंतागुंतीचे अभियान असून, जहाज बाजूला करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील. आजही जहाज बाजूला करण्याचे प्रयत्न निष्फळ ठरले. 

सुवेझ कालवा प्राधिकरणाने आंतरराष्ट्रीय पातळीवरून होत असलेल्या मदतीबद्दल आभार मानले आहे. अमेरिकेनेही इजिप्तचा कालव्यातील वाहतूक पूर्ववत करण्यासाठी मदत देण्याची तयारी दर्शविली आहे. आमच्याकडे असणारी उपकरणे आणि साधने ही बहुतांश देशांकडे नाहीत. आम्ही कशाप्रकारे मदत करु शकतो यावर विचार करीत आहोत, असे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी सांगितले.  
दोनशे मालवाहू जहाजे अडकून पडली 

जहाज सुएझ कालव्यात अडकल्याने सुमारे २०० मालवाहू जहाजे जलवाहतूक कोंडी सुटण्याच्या प्रतीक्षेत आहेत. याचबरोबर शंभरहून अधिक जहाजे त्या मार्गावर आहेत. एव्हर गिव्हन जहाजामुळे निर्माण झालेली कोंडी सुटत नसल्याचे पाहून काही जहाजांनी दुसरा मार्ग निवडला आहे. आफ्रिकेला वळसा घालून ही जहाजे रवाना होत आहेत. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com