लहान मुलांसाठी खूषखबर; कोरोना लशीला मिळाला हिरवा कंदील

तिसऱ्या लाटेत लहान मुलांनाही मोठ्या प्रमाणावर संसर्ग होण्याचा धोका व्यक्त केला जात आहे.
लहान मुलांसाठी खूषखबर; कोरोना लशीला मिळाला हिरवा कंदील
Covid Vaccination Sarkarnama

नवी दिल्ली : देशात 18 वर्षांपुढील सर्व नागरिकांचे कोरोना लसीकरण (Corona Vaccination) सुरू असताना आता लहान मुलांनाचे लसीकरणही लवकरच सुरू होणार आहे. भारत बायोटेकने (Bharat Biotech) दोन ते 18 वर्षांतील मुलांसाठी लस तयार केली आहे. या लशीच्या वापराला आपत्कालीन परवानगी देण्याची शिफारस तज्ज्ञ समितीनं केली आहे. आता लवकरच औषध महानियंत्रकांकडून (DCGI) त्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

देशात सध्या कोरोनाची दुसरी लाट जवळपास ओसरली आहे. पहिल्या व दुसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग फारसा झाला नाही. पण तिसऱ्या लाटेत लहान मुलांनाही मोठ्या प्रमाणावर संसर्ग होण्याचा धोका व्यक्त केला जात आहे. त्याअनुषंगाने लहान मुलांच्या उपचारासाठी स्वतंत्र रुग्णालये सज्ज ठेवली जात आहे. तसेच काही कंपन्यांकडून लहान मुलांवर लशींच्या चाचण्या सुरू करण्यात आल्या आहेत. या चाचण्यांचे अंतिम निष्कर्ष अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. काही देशांमध्ये यापूर्वीच लहान मुलांच्या लसीकरणाला मान्यता देण्यात आली आहे.

Covid Vaccination
भाजपनं डच्चू दिलेल्या मनेका गांधी अखेर बोलल्या...

संसर्गाची साखळी तोडण्याच्यादृष्टीने लहान मुलांचे लसीकरण महत्वाचे ठरणार आहे. तसेच लवकरात लवकर शाळा सुरू होण्यासाठीही हे पाऊल आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. लहान मुलांमध्ये 2 ते18 वयोगटातील मुलांचा समावेश असेल. भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन आणि झायडस कॅडिलाच्या लशीच्या मुलांवर चाचण्या सुरू आहेत. भारत बायोटेकने चाचणीचा दुसरा व तिसरा टप्पा सप्टेंबर महिन्यात पूर्ण केला आहे. तर ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीला चाचण्यांचा अहवाल औषध महानियंत्रकांकडे सादर केला आहे.

कंपनीने सादर केलेल्या माहितीचा अभ्यास केल्यानंतर दोन ते 18 वर्षांमधील मुलांवर लशीच्या आपत्कालीन वापरासाठी शिफारस केल्याचे तज्ज्ञ समितीने म्हटले आहे. भारतात तयार झालेल्या या लशीचेही दोन डोस द्यावे लागणार आहे. मात्र, दोन डोसमधील अंतर केवळ 20 दिवसांचे असणार आहे. मात्र, अद्याप लशींच्या चाचणीचे निष्कर्ष जाहीर करण्यात आलेले नाहीत.

दरम्यान, भारतात आतापर्यंत 96 कोटी डोस देण्यात आले आहेत. या वर्षाच्या अखेरपर्यंत 18 वर्षांपुढील सर्वांना लस देण्याचे केंद्र सरकारचे लक्ष्य आहे. सध्या कोव्हॅक्सिनसह कोविशिल्ड, स्पुटनिक, जॉन्सन अॅन्ड जॉन्सन आणि मॉडर्ना या लशींना 18 वर्षांपुढील नागरिकांच्या वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे. तर लहान मुलांसाठी कोव्हॅक्सिन ही पहिलीच लस ठरणार आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in