नितीशकुमारांच्या सभेत तरुणांची दगडफेक..सुरक्षा यंत्रणांची धावाधाव

बिहारच्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. नितीशकुमार यांना आज पुन्हा एकदा संतप्त जनतेला सामोरे जावे लागले.
stone pelted at chief minister nitish kumar during campaign in madhubani
stone pelted at chief minister nitish kumar during campaign in madhubani

पाटणा : बिहारच्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे आज जाहीर सभेवेळी दगडफेकीने स्वागत करण्यात आले. सुरक्षा यंत्रणांना तातडीने मुख्यमंत्र्यांचा बचावासाठी त्यांच्याभोवती सुरक्षे कडे उभारले. यामुळे मोठी खळबळ उडाली होती. याआधीही एकदा नितीशकुमार यांना संतप्त जमावाकडून दगडफेकीचा सामना करावा लागला होता. 

नितीशकुमार यांची आज मधुबनी जिल्ह्यात जाहीर सभा होती. नितीशकुमारांचे सभेच्या ठिकाणी आगमन झाल्यानंतर गर्दीतील काही तरुणांना नितीश यांना दगड फेकून मारले. यामुळे सुरक्षा यंत्रणांना तातडीने नितीशकुमारांभोवती सुरक्षा कडे उभारले. नंतर दगड फेकणाऱ्या व्यक्तींना सुरक्षा यंत्रणांनी ताब्यात घेतले. परंतु, नितीशकुमारांनी त्यांना सोडून देण्यास सांगितले. याआधी लालूप्रसाद यादवांचा बालेकिल्ला असलेल्या छपरामध्ये नितीशकुमारांच्या जाहीर सभेवेळी काही तरुणांनी गोंधळ घातला होता. 

या वेळी बोलताना नितीशकुमारांनी या घटनेसाठी विरोधकांना जबाबदार धरले. दगड फेकणाऱ्या तरुणांना त्यांनी आणखी दगड मारण्याचे आव्हान दिले. ते म्हणाले की, आणखी दगड मारा, जेवढे मन असेल तेवढे दगड मारा. विरोधक जनतेची दिशाभूल करीत आहेत. राजकीय फायद्यासाठी ते जनतेला फसवत आहेत. अव्यहार्य आणि खोटी आश्वासने देणाऱ्या पक्षांपासून जनतेने दूर राहावे. माझ्यावर दगड फेकणाऱ्यांना मी माफ करीत आहे.  

याआधी 12 जानेवारी 2018 रोजी नितीशकुमारांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली होती. बक्सर जिल्ह्यातील नंदन गावात ही घटना घडली होती. यानंतर पोलिसांना दगडफेक करणाऱ्यासह इतर नागरिकांना बेदम मारहाण केली होती. त्यावेळी महिलांनाही पोलिसांनी मारहाण केली होती.  

बिहार विधानसभेची निवडणूक तीन टप्प्यांत होत आहे. पहिला टप्पा २८ ऑक्टोबरला झाला असून, यात ७१ मतदारसंघ होते. दुसरा टप्पा  आज सुरू असून, यात ९४ मतदारसंघ आहेत. तिसरा टप्पा ७ नोव्हेंबर असून, यात ७८ मतदारसंघ आहेत. निकाल १० नोव्हेंबरला जाहीर होणार आहेत.  बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत सत्तारुढ संयुक्त जनता दल (जेडीयू) आणि भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात (एनडीए) राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), काँग्रेस आणि डावे यांची महाआघाडी असे चित्र आहे.

राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) एलजेपी बाहेर पडला आहे. चिराग पासवान यांनी राष्ट्रीय स्तरावर आणि लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत राहण्याची भूमिका घेतली आहे. परंतु, बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पातळीवर जेडीयूसोबत वैचारिक मतभेद असल्याचे कारण देत स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, भाजपचे मोठ्या प्रमाणात बंडखोर नेते एलजेपीत दाखल झाले आहेत. ते जेडीयूच्या विरोधात मैदानात उतरले आहेत. यामुळे भाजप आणि चिराग पासवान यांची छुपी युती असल्याची चर्चा सुरू आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com