मोदी सरकारचा दुटप्पीपणा : सिरमच्या कोरोना लशीची किंमत राज्यांसाठी डबल

लशीसाठी केंद्र सरकार विसंबून राहण्याची राज्यांना गरज नाही. राज्ये आणि खासगी रुग्णालये थेट लस खरेदी करु शकतात परंतु, यासाठी जादा पैसे मोजावे लागतील.
state governments will pay more than double for seum covid vaccine
state governments will pay more than double for seum covid vaccine

नवी दिल्ली : केंद्र सरकारने राज्ये आणि खासगी रुग्णालयांना सिरमकडून थेट कोरोना लस घेण्याची परवानगी दिली आहे. या पार्श्वभूमीवर सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कोव्हिशिल्ड ही लस राज्य सरकारांना 400 रुपयांना तर खासगी रुग्णालयांना 600 रुपयांना देण्याचे जाहीर केले आहे. याचवेळी केंद्र सरकारला मात्र, ही लस 150 रुपयांतच ही लस मिळत आहे. केंद्राच्या दुप्पट किंमत राज्यांना का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. 

केंद्रीय आरोग्य मंत्रालय व अर्थ मंत्रालयाने कोरोना लशीच्या उत्पादनाचा वेग वाढवण्यासाठी प्रोत्साहन देणारी पावले उचलली आहेत. याअंतर्गत राज्य सरकारे, खासगी रुग्णालये आणि लसीकरणे केंद्रे थेट कोरोना लशीची खरेदी करु शकतात. पुढील दोन महिन्यांत सिरमने उत्पादन वाढवण्यावर भर देण्याचा निर्मय घेतला आहे. लशीच्या एकूण उत्पादनाच्या 50 टक्के केंद्र सरकारच्या लसीकरण कार्यक्रमाला आणि उरलेले 50 टक्के राज्य सरकारे आणि खासगी रुग्णालयांना देण्यात येणार आहे, असे सिरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी म्हटले आहे.  

यासाठी सिरमने दरपत्रक जाहीर केले आहे. कोव्हिशिल्ड लशीच्या एका डोससाठी राज्यांना 400 रुपये मोजावे लागतील. याचवेळी खासगी रुग्णालयांना यासाठी 600 रुपये द्यावे लागतील. पुढील 4 ते 5 महिन्यांत ही लस किरकोळ विक्रीसाठी खुल्या बाजारात उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न आहे, असेही पूनावाला यांनी म्हटले आहे. 

या प्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ते साकेत गोखले यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, सिरमची एकूण लस उत्पादनातील 50 टक्के वाटा केंद्र सरकारला 157.50 रुपयांत मिळणार आहे. याचवेळी उरलेला 50 टक्के वाटा राज्यांना मिळणार असला तरी त्यासाठी प्रतिलस 400 रुपये आकारले जाणार आहे. मोदी आणि त्यांचे भांडवलदार मित्र कोरोना महामारीच्या काळात पैसे कमवण्यासाठी  राज्यांचे किती शोषण करणार आहेत. 

पीएमकेअर फंडासाठी सिरमची लशीचा दर 210 रुपये, केंद्र सरकारसाठी 157.50 रुपये आणि आता राज्य सरकारांना दुपटीहून अधिक म्हणजे 400 रुपयांना देण्यात येणार आहे. मोदींच्या लसीकरण नियमावलीच्या आधारे ही दिवसाढवळ्या चोरी सुरू आहे, असे गोखले यांनी म्हटले आहे.

देशात कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लशींचा वापर लसीकरणासाठी होत आहे. सिरम इन्स्टिट्यूट ही कोव्हिशिल्ड या कोरोना लशीचे उत्पादन करीत आहे. ही लस ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेन्का यांनी विकसित केली आहे. दुसरी लस ही भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही आहे. आता रशियाच्या स्पुटनिक व्ही या लशीच्या आपत्कालीन वापरासही केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. 

Edited by Sanjay Jadhav
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com