गर्दीमुळे सभेचे स्टेज कोसळले अन् पप्पू यादवांचा हात मोडला

बिहारच्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून जाहीर सभा घेण्यावर भर दिला जात आहे.
 The stage and tent set up for Jan Adhikar Party leader Pappu Yadavs campaign rally collapses
The stage and tent set up for Jan Adhikar Party leader Pappu Yadavs campaign rally collapses

पाटणा : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला आहे. राजकीय नेत्यांच्या मुलुखमैदान सभाही होऊ लागल्या आहेत. अशाच एका सभेत मंचावर नेत्यांसह कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली. यामुळे अखेर मंचच कोसळला. जन अधिकार पार्टी-लोकतांत्रिकचे अधअयक्ष पप्पू यादव यांच्या सभेवेळी आज ही घटना घडली. यात पप्पू यादव यांचा हात मोडला आहे. याआधीही एकदा बिहारमध्ये जाहीर सभेचा मंच कोसळला होता. 

पप्पू यादव यांच्या नेतृत्वाखाली प्रोगेसिव्ह डेमोक्रॅटिक आघाडी बिहारच्या मैदनात उतरली आहे. पप्पू यादव हे या आघाडीचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार आहेत. ते स्वत: मधेपुरा मतदारसंघातून रिंगणात उतरले आहेत. त्यांच्यासोबत आघाडीत चंद्रशेखर आझाद यांची आझाज समाज पार्टी, बहुजन समाज पार्टी आणि सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया हे पक्ष आहेत. 

पप्पू यादव यांची आज मुझफ्फरपूरमधील मीनापूर मतदारसंघात जाहीर सभा होती. सभेसाठी उभारण्यात आलेल्या मंचावरुन यादव हे भाषण करीत असताना अचानक मंच कोसळला. यामुळे मोठी खळबळ उडाली. यात जखमी झालेल्या यादव यांना तातडीने स्थानिक रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे त्यांच्यावर प्रथमोपचार करण्यात आले. यादव यांचा हात मोडला आहे. यानंतर बोलताना पप्पू यादव म्हणाले की, जनतेचे प्रेम आणि आर्शीवादामुळे मला फारसे लागले नाही. जनतेच्या सदिच्छा माझ्यासोबत आहेत. मी लवकरच बरा होऊन तुमच्यापर्यंत पोचेन. 

याआधी लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजप्रताप यांचे सासरे चंद्रिका राय यांच्या सरण जिल्ह्यातील जाहीर सभेवेळी मंच कोसळला होता. राय हे संयुक्त जनता दलाकडून (जेडीयू) निवडणूक लढवत आहेत. ते सोनपूर विधानसभा मतदारसंघातून रिंगणात उतरले आहेत. या सभेला भाजपचे नेते राजीव प्रताप रुडी हे सुद्धा उपस्थित होते. राय यांचे भाषण सुरू होण्याआधी त्यांना हार घालण्यासाठी कार्यकर्त्यांची झुंबड उडाली होती. अखेर मंचावर मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन तो कोसळला होता. मंच कोसळल्याने काही जण किरकोळ जखमी झाले होते.  

बिहार विधानसभेची निवडणूक तीन टप्प्यांत होत आहे. पहिला टप्पा २८ ऑक्टोबरला झाला असून, यात ७१ मतदारसंघ होते. दुसरा टप्पा  ३ नोव्हेंबरला असून, यात ९४ मतदारसंघ आहेत. तिसरा टप्पा ७ नोव्हेंबर असून, यात ७८ मतदारसंघ आहेत. निकाल १० नोव्हेंबरला जाहीर होणार आहेत.  बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत सत्तारुढ संयुक्त जनता दल (जेडीयू) आणि भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात (एनडीए) राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), काँग्रेस आणि डावे यांची महाआघाडी असे चित्र आहे. 

या निवडणुकीत आरजेडी हा काँग्रेसला सोबत घेऊन महाआघाडीचे नेतृत्व करत आहे. याचवेळी एनडीएमधून लोक जनशक्ती पक्ष (एलजेपी) बाहेर पडला आहे. चिराग पासवान यांनी राष्ट्रीय स्तर आणि लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत राहण्याची भूमिका घेतली आहे. परंतु, बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पातळीवर जेडीयूसोबत वैचारिक मतभेद असल्याचे कारण देत स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. 

बिहारमधील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) आणि महाआघाडीला टक्कर देण्यासाठी ग्रँड डेमोक्रॅटिक सेक्युलर फ्रंट स्थापन करण्यात आला आहे. राष्ट्रीय लोक समता पक्षाचे उपेंद्र कुशवाह हे फ्रंटचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार आहेत. यात ओवेसी यांचा ऑल  इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल मुसलमीन (एआयएमआयएम), मायावती यांचा बहुजन समाज पक्ष (बसप), सुहेलदेव भारतीय समाज पार्टी, सामाजिक जनता दल (डेमोक्रॅटिक) आणि जनतांत्रिक पार्टी (सोशालिस्ट) समावेश आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com