महात्मा गांधींच्या चष्म्याची कोटीच्या कोटी उड्डाणे..!

महात्मा गांधी यांच्या चष्म्यासाठी ऑनलाइन लिलावात विक्रमी बोली लावण्यात आली. कोटींच्या घरात लावण्यात आलेल्या बोलीमुळे या चष्म्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
spectacles worn by mahatma gandhi set auction record in britain
spectacles worn by mahatma gandhi set auction record in britain

लंडन : महात्मा गांधी यांच्या चष्म्याने ऑनलाइन लिलावात विक्रम प्रस्थापित केला. गांधीजींच्या चष्म्याने लिलावात कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली. या चष्म्यासाठी २ कोटी ५५ लाख रुपयांची बोली लावण्यात आली. ब्रिटनमधील ब्रिस्टॉल शहरात गांधीजींच्या चष्म्याचा ऑनलाइन लिलाव करण्यात आला. 

इस्ट ब्रिस्टॉल ऑक्शन्स संस्थेकडून हा लिलाव आयोजित करण्यात आला होता. महात्मा गांधी यांनी १९१०-३० या काळात हा चष्मा घातला होता. त्यानंतर एका कुटुंबास तो भेट म्हणून दिला होता. या चष्म्यासाठी १० हजार ते १५ हजार पौंड (सुमारे ९.७७ ते १४.६६ लाख रुपये) बोली अपेक्षित होती. मात्र, हा चष्मा दोन कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीस विकला गेला. महात्मा गांधींच्या या चष्म्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. परंतु, त्याची किंमत आधी सांगण्यात आली नव्हती. ही वस्तू मौल्यवान नसेल तर ती नष्ट करा, असे सांगण्यात आले होते. 

‘महात्मा गांधी यांनी वापरलेला चष्मा’ या मथळ्याखाली २१ ऑगस्टला या लिलावाचे आयोजन करण्यात आले होते. गांधी यांच्या चष्म्याने लिलाव सुरू होण्यापूर्वीच सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. काही भारतीयांनीही हा चष्मा खरेदीसाठी विशेष रस दाखवला होता. चष्म्याला सर्वात अगोदर ६ हजार पौंडची ऑनलाइन बोली लावण्यात आली होती. सोनेरी मुलामा दिलेल्या काड्यांचा हा चष्मा आहे. गांधींजींच्या नंतरच्या चष्म्यांशी याचे साधर्म्य आहे. 

महात्मा गांधींचा हा चष्मा ब्रिटनमधील एका अज्ञात कुटुंबाकडे होता. हा चष्मा त्यांच्याकडे कसा आला, याबाबत चष्मा विक्रेत्याने सांगितले की, वडिलांच्या काकाकडे हा चष्मा होता. हा चष्मा त्यांना महात्मा गांधींनी भेट म्हणून दिला होता. दक्षिण आफ्रिकेत ब्रिटिश पेट्रोलियमध्ये त्यांचे काका १९१०-३० या काळात काम करत होते. चष्म्याचा मालक हा लिलावातून मिळालेला पैसा आपल्या मुलीला देणार आहे. 

या विषयी बोलताना लिलाव करणारे अँडी स्टो म्हणाले की, एका मौल्यवान वस्तूसाठी अतिशय मौल्यवान अशी बोली लावण्यात आली. आमच्यासाठी या चष्म्याला विक्रमी किंमत मिळाली एवढेच त्याचे महत्व नाही तर तो एक ऐतिहासिक वारसा आहे. ज्यावेळी चष्मा विकणाऱ्याला त्याची किंमत कळाली त्यावेळी तो खुर्चीवरुन खाली पडणेच बाकी होता. आपणा सर्वांना स्वप्नवत वाटावा असा हा लिलाव झाला. हा चष्मा महात्मा गांधी यांनी सुरुवातीच्या काळात दक्षिण आफ्रिकेत वापरलेला असण्याची शक्यता आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com