विशेष न्यायालयाच्या दणक्यामुळे मुख्यमंत्री येडियुरप्पांची खुर्ची धोक्यात - special court orders reinvestigation against cm b s yediyurappa | Politics Marathi News - Sarkarnama

विशेष न्यायालयाच्या दणक्यामुळे मुख्यमंत्री येडियुरप्पांची खुर्ची धोक्यात

वृत्तसंस्था
सोमवार, 5 जुलै 2021

कर्नाटकात भाजपमधील अंतर्गत मतभेद दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना हटवण्यासाठी जोरदार मोहीम सुरू झाली आहे. 

बंगळूर : कर्नाटकचे (Karnataka) मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा (B.S.Yediyurappa) पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. जमीन गैरव्यवहार प्रकरणात विशेष न्यायालयाने लोकायुक्त पोलिसांना फेरचौकशीचा आदेश दिला आहे. या प्रकरणी येडियुरप्पांच्या विरोधात 2013 मध्ये तक्रार दाखल झाली होती. यामुळे येडियुरप्पांची खुर्ची धोक्यात आल्याचे मानले जात आहे. 

या प्रकरणात वासुदेव रेड्डी यांनी तक्रार दाखल केली होती. आयटी कॉरिडॉरसाठी संपादित केलेली जमीन व्यक्तिगत फायद्यासाठी डीनोटिफाईड केल्याचा आरोप येडियुरप्पांवर आहे. येडियुरप्पा त्यावेळी उपमुख्यमंत्री होते. या याचिकेवर सुनावणी घेत विशेष न्यायालयाचे न्यायाधीश श्रीधर गोपालकृष्ण भट यांनी फेरचौकशीचा आदेश दिला. येडियुरप्पा यांनी कायद्यानुसार डिनोटिफिकेशन केले आहे, असे म्हणता येणार नाही, असे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले आहे. 

न्यायालय म्हणाले की, एफआयआर 2015 मध्ये दाखल होऊनही लोकायुक्त पोलिसांनी २०२० पर्यंत चौकशी पूर्ण केलेली नाही. चौकशीला जाणीवपूर्वक विलंब लावण्यात आला. येडियुरप्पा मुख्यमंत्री झाल्यानंतर लोकायुक्त पोलिसांनी दबावाखाली चौकशीस विलंब केला, असे आताच म्हणता येणार नाही. परंतु, पोलीस राजकारण्यांच्या दबावाखाली काम करीत असल्याची भावना निर्माण होण्यास वाव आहे. लोकप्रतिनिधींवरील प्रकरणाच्या चौकशीवर विशेष न्यायायाने लक्ष ठेवण्याची गरज आहे. 

हेही वाचा : मुख्यमंत्र्यांच्या उचलबांगडीसाठी भाजप आमदाराचे थेट चामुंडेश्वरीला साकडे 

कर्नाटकात मागील काही काळापासून भाजपच्या नेत्यांनी उघडपणे मुख्यमंत्र्यांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. याचबरोबर काही आमदारांनी तर थेटपणे मुख्यमंत्र्यांना आव्हान दिले आहे. राज्यातील भाजप नेत्यांमध्ये मुख्यमंत्र्यांबद्दल मोठी नाराजी आहे. ही नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पदावरुन हटवले जाईल, अशी चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाचे प्रभारी अरुणसिंह यांनी नुकतीच राज्यातील नेत्यांशी चर्चा केली होती. 

काही दिवसांपूर्वी पक्षाचे नेते आमदार एच.विश्वनाथ यांनी येडियुरप्पांबद्दल संपूर्ण मंत्रिमंडळच नाराज असल्याचा बॉम्ब टाकला होता. विश्वनाथ यांनी यात राज्य भाजपमधील वादात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही ओढले होते. येडियुरप्पांचे एकेकाळचे निकटवर्ती सहकारी के.एस.ईश्वरप्पा यांनीही विरोधात मोहीम उघडली आहे. ईश्वरप्पा यांनी तर मुख्यमंत्र्यांच्या विरोधात थेट राज्यपालांकडे तक्रार केली होती. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख