सभापती पदासाठी अर्ज भरणाऱ्या महिलेच्या पदराला भाजप कार्यकर्त्यांनी घातला हात   - SP candidates sari was pulled by BJP Workers in Uttar Pradesh | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

चिपळूणमध्ये : पुराचे पाणी अपरांत हाँस्पिटलमध्ये शिरले त्यामुळे वीज पुरवठा बंद झाल्यामुळे व्हेंटिलेटरवरील ८ रुग्ण दगावले.
महाड तालुक्यातील तळीये गावातील 32 घरांवर दरड कोसळली | दरडीत घरांचे मोठे नुकसान | 72 लोक बेपत्ता झाल्याचा अंदाज| पोलिसांचे पथक घटना स्थळाकडे रवाना

सभापती पदासाठी अर्ज भरणाऱ्या महिलेच्या पदराला भाजप कार्यकर्त्यांनी घातला हात  

वृत्तसंस्था
गुरुवार, 8 जुलै 2021

भाजप कार्यकर्त्यांनी गैरवर्तन केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

लखनऊ : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणूकीत भाजपला मोठं यश मिळाल्यानंतर आता पंचायत समिती (ब्लॅाक प्रमुख) सभापतीसाठीच्या निवडणूकीची धामधूम सुरू आहे. सुमारे 825 समितींसाठी ही निवडणूक होणार आहे. पण अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी आज अनेक ठिकाणी हिंसाचार तसेच महिलांशी गैरवर्तन केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. (SP candidates sari was pulled by BJP Workers in Uttar Pradesh)

उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाच्या महिला उमेदवाराशी भाजप कार्यकर्त्यांनी गैरवर्तन केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. लखीमपुर खीरी जिल्ह्यातील पसगवां ब्लॅाकमध्ये समाजवादी पक्षाकडून त्या उमेदवारी अर्ज भरण्यास जात होत्या. पण कार्यालयात जाण्यापासून भाजप कार्यकर्त्यांनी त्यांची अडवणूक केली. हे कार्यकर्ते त्यांची साडी ओढत असल्याचे व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. अखेर या महिलेला अर्ज भरताच आला नाही, असे समजते.

भाजपचे हे समर्थक पक्षाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष व खासदार रेखा वर्मा यांचे नातेवाईक असल्याची चर्चा आहे. ही घटना समोर आल्यानंतर काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी व सपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी योगी सरकारवर जोरदार टीका केली आहे. यादव यांनी हा व्हिडीओही ट्विट करत निवडणूक जिंकण्यासाठी महिलेचा अपमान केल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 

उत्तर प्रदेशमध्ये अनेक ठिकाणी हिंसाचार झाल्याचेही समोर आलं आहे. प्रियांका गांधी यांनी याबाबतचा एक व्हिडीओ ट्विट केला आहे. पीएम साहेब आणि सीएम साहेब यासाठीही शुभेच्छा द्या, आपल्या कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी गोळाबार, दगडफेक केली. अनेक पत्रकारांना मारहाण केली. अनेक ठिकाणी महिलांशी गैरवर्तन केलं. कायदा-सुव्यवस्थेच्या डोळ्यांवर पट्टी बांधून लोकशाहीचे वस्त्रहरण सुरू आहे, अशी टीका गांधी यांनी केली आहे.

उत्तर प्रदेशातील संत कबीर नगर, सिध्दार्थ नगर, पीलीभीत, उन्नाव, सीतापूर, लखीमपूर, रायबरेली, एटा, अलीगढ, बदायूं, बुलंदशहर, बिजनौर आदी जिल्ह्यांमध्ये हिंसाचाराच्या घटना समोर आल्या आहेत. काही ठिकाणी दगडफेक, गोळीबाराच्या घटना घडल्या आहे. उमेदवारांना मारहाण झाल्याचेही समोर आलं आहे. समाजवादी पक्षाने याबाबत भाजपला जबाबदार धरले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख