गुड न्यूज : ड्रोन करणार कोरोना लस अन् औषधांची डिलिव्हरी - soon vaccine and life saving drugs delivery by drones in remote areas | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

गुड न्यूज : ड्रोन करणार कोरोना लस अन् औषधांची डिलिव्हरी

वृत्तसंस्था
बुधवार, 16 जून 2021

कोरोना लस आणि जीवनावश्यक औषधांचा पुरवठा देशातील दुर्गम भागात ड्रोनद्वारे लवकरच होण्याची शक्यता आहे. 

नवी दिल्ली : कोरोना लस (Covid Vaccine) आणि जीवनावश्यक औषधांचा (Life saving drugs) पुरवठा देशातील दुर्गम भागात ड्रोनद्वारे (Drone) लवकरच होण्याची शक्यता आहे. यामुळे देशातील लसीकरण मोहिमेलाही गती मिळेल, अशी माहिती लसीकरणविषयक राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाचे प्रमुख डॉ.एन.के.अरोरा यांनी दिली. 

सध्या भारतात ड्रोनवर अनेक निर्बंध आहेत. त्यांचा लस पुरवठा आणि जीवनावश्यक औषधे पोचवण्यासाठी वापर व्हावा, यासाठी हे निर्बंध शिथिल करण्यात येणार आहेत. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने कोरोना लशीचा पुरवठा ड्रोनच्या साहाय्याने करण्याचे संशोधन सुरू केले आहे. यासाठी आयआयटी कानपूरसोबत भागीदारी करण्यात आली आहे. आयआयटी कानपूरने ड्रोनवरील संशोधन सादर केले आहे. 

याविषयी बोलताना डॉ. अरोरा म्हणाले की, भारत मागील वर्षभरापासून याची तयारी करीत आहे. मागील वर्षाच्या मध्यानंतर यावर संशोधन सुरू झाले. ईशान्य भारत, आदिवासी भाग, डोंगराळ भाग तसेच, दुर्गम भागात कोरोना लस पुरवठा करण्याचे आव्हान आहे. या भागांमध्ये लस पुरवठा करण्यासाठी जास्त कालावधी लागतो आणि कोल्ड चेनही कायम राखावी लागते. हा सर्व खटाटोप करण्याच्या तुलनेत अशा भागातील लशीची संख्या कमी असते. यामुळे ड्रोनच्या साहाय्याने लस पुरवठा करण्याचा विचार पुढे आला. 

आयआयटीसोबत झालेल्या संशोधनातून ड्रोनच्या साहाय्याने लस पुरवठा करणे शक्य असल्याचे समोर आले आहे. आपल्याला ज्या ठिकाणी लस घेऊन पोचता येत नाही, अशा ठिकाणी ड्रोनच्या साहाय्याने लस पोचवता येईल. इतर जीवनावश्यक औषधांच्या बाबतीत ड्रोनची मदत घेता येईल. ड्रोनच्या मदतीने अशी औषधे दुर्गम भागात जलद गतीने पोचवता येतील. 

हेही वाचा : राम मंदिर ट्रस्टवर शंकराचार्य संतापले अन् म्हणाले, चंपत रायना तेथून हाकला! 

सध्या देशात कोरोना लसीकरणाचा चौथा टप्पा सुरू आहे. या टप्प्यात 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना लस दिली जात आहे. लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात 1एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना ही लस दिली जात आहे. जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरणास भारतात 16 जानेवारीला सुरवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले होते. 

सरकारने लस देण्याचा प्राधान्यक्रम ठरवला आहे. यातील पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, कोरोनाच्या आघाडीवर लढणारे पोलीस, नागरी सुरक्षा कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचारी यांचा समावेश होता. लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ही लस 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना देण्यात आली. तसेच, मधुमेह आणि उच्च रक्तदाबासह इतर आजार असलेल्या 45 वर्षांवरील व्यक्तींनाही लस दिली गेली. 

देशात कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लशींचा वापर लसीकरणासाठी होत आहे. आता केंद्र सरकारने रशियाच्या स्पुटनिक व्ही या लशीच्या आपत्कालीन वापरास परवानगी दिली आहे. स्पुटनिकचे उत्पादन डॉ.रेड्डीज ही कंपनी करीत आहे. सिरम इन्स्टिट्यूट ही कोव्हिशिल्ड या कोरोना लशीचे उत्पादन करीत आहे. ही लस ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेन्का यांनी विकसित केली आहे. दुसरी लस ही भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही आहे.  

Edited by Sanjay Jadhav 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख