some peoples from bollywood are targeting their own industry said jaya bacchan | Sarkarnama

जया बच्चन संतापल्या अन् म्हणाल्या, जिस थाली मे खाते है, उसी मे छेद करते है!

मंगेश वैशंपायन
मंगळवार, 15 सप्टेंबर 2020

अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणावरुन बॉलीवूड ढवळून निघाले आहे. यातच कंगनाने राणावतने बॉलीवूडला घरचा आहेर देण्यास सुरूवात केली आहे. यावर जया बच्चन यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 

नवी दिल्ली : बॉलीवूडमधील ड्रग्जच्या व्यापाराबद्दल भोजपुरी अभिनेते व भाजपचे खासदार रविकिशन यांनी काल लोकसभेत केलेल्या टिप्पणीवर खासदार जया बच्चन यांनी आज राज्यसभेत जोरदार आक्षेप घेतला. चित्रपट क्षेत्राच्या जिवावर मोठे झालेल्या काही जणांकडूनच त्याच बॉलीवूडच्या बदनामीचे कारस्थान सुरू आहे, असा आरोप त्यांनी केला. 'जिस थाली मे खाते है, उस मे छेद करते है, ये गलत बात है', अशा शब्दांत त्यांनी रवीकिशन आणि कंगना राणावत यांना नाव न घेता फटकारले. 

जया बच्चन म्हणाल्या की, काल लोकसभेत करण्यात आलेल्या वक्तव्यामुळे मला लाजिरवाणे वाटत आहे. चित्रपट उद्योग प्रत्यक्षपणे 5 लाख लोकांना तर अप्रत्यक्षपणे 50 लाख लोकांना रोजगार देतो. मात्र, या उद्योगाला सरकारचा काहीही पाठिंबा नाही. उलट सर्वाधिक कर भरणाऱ्यांचा छळच होतो आहे. त्यात येथेच मोठे झालेले काही लोक या क्षेत्राबद्दल सोशल मीडियावर बेजबाबदारपणे बोलतात. काल लोकसभेत एक खासदाराने चित्रपटसृष्टीची तुलना गटाराशी केली. हे लज्जास्पद आहे. अशांना चाप लावण्याची आवश्यकता आहे. काही लोकांमुळे संपूर्ण चित्रपटसृष्टीला बदनाम करणे या लोकांनी थांबवावे. 

जया बच्चन यांचे नाव पुकारल्यावर त्यांनी आपल्याला मास्क घालून बोलण्यास अडचणी येत असल्याचे सांगितले. यावर सभापती वेंकय्या नायडू यांनी, इतके सुंदर व्यक्तिमत्व दिसत आहे व इतके प्रसिध्द नाव आहे. त्यांना स्वतःचा परिचय देण्याची गरज काय, अशी टिप्पणी केली. तोच धागा पकडून बच्चन म्हणाल्या की, मला हे ज्यामुळे नाव मिळाले त्या फिल्म इंडस्ट्रीला ड्रग व्यापाराशी जोडून बदनाम करण्याचे प्रकार सुरू आहेत. 

पक्षाने तुमची पदावनती केली...
छत्तीसगडमधील काँग्रेस खासदार छाया वर्मा यांचे नाव पुकारल्यावर वर्मा यांनी, मी राज्यसभेची सदस्या आहे. मात्र, लोकसभेतून बोलत आहे, असे सांगितले. यावर नायडू म्हणाले की, सदस्यांना दोन्ही सभागृहांत बसण्याची परवानगी मी दिली आहे. तुमची पदावनती म्हणजे कनिष्ठ सभागृहात तुम्हाला पाठवण्याचा निर्णय गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा व जयराम रमेश यांनी घेतला आहे. त्याला मी जबाबदार नाही. त्यांच्या या टिप्पणीवर हशा पिकला. 

Edited by Sanjay Jadhav
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख