स्मृती इराणी, वसुंधरा राजे याही हेरगिरीच्या भोवऱ्यात - Smriti Iranis OSD mobile number in Pegasus list-rm82 | Politics Marathi News - Sarkarnama

स्मृती इराणी, वसुंधरा राजे याही हेरगिरीच्या भोवऱ्यात

वृत्तसंस्था
मंगळवार, 20 जुलै 2021

केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंग पटेल यांच्यासह काँग्रेसचे नेते राहुल गांधी, राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांचाही यादीत समावेश आहे.

नवी दिल्ली :  राजकारण्यांसह पत्रकार, उद्योजक व इतर काही व्यक्तींचे मोबाईल पिगॅसस स्पायवेअरद्वारे हॅक करण्यात आल्याचं स्पष्ट झाल्यानंतर भारतात मोठा गदारोळ निर्माण झाला आहे. या यादीत दोन केंद्रीय मंत्र्यांचाही समावेश आहे. तसेच महिला व बाल कल्याण मंत्री स्मृती इराणी व राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचीही हेरगिरी करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. (Smriti Iranis OSD mobile number in Pegasus list)

सुरूवातीला भारतातील 40 पत्रकारांचे फोन हॅक केल्याची माहिती भारतातील एका वृत्तसंस्थेने दिली होती. त्यानंतर आता केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंग पटेल यांच्यासह काँग्रेसचे नेते राहुल गांधी, राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर, तृणमूलचे खासदार अभिषेक बॅनर्जी, अशोक लवासा, निवृत्त सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप करणारी महिला यांच्यासह काही सुरक्षा यंत्रणांचे आजी-माजी प्रमुख, अधिकारी, काही उद्योजकांचाही त्यात समावेश असल्याचा दावा करण्यात आला आहे. 

हेही वाचा : पेगॅसिसवरून भाजप अडचणीत अन् फडणवीसांचे यूपीएकडं बोट!

अनेक वृत्तसंस्थांनी याबाबतचे वृत्त दिले आहे. त्यांच्या मोबाईल क्रमांकांना लोकसभेच्या 2019 च्या निवडणुकीआधी 2018-19 मध्ये लक्ष्य करण्यात आले होते, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे. या यादीत स्मृती इराणी यांचे विशेषाधिकारी संजय कचरू आणि वसुंधरा राजे यांच्या खासगी सचिवांचे मोबाईल क्रमांकही आहेत. त्यामुळे भाजपमध्येही खळबळ उडाली आहे. 

स्मृती इराणी यांना विस्तारित मंत्रिमंडळामध्ये महिला व बाल कल्याण हे महत्वाचं खातं देण्यात आलं आहे. तसेच मंत्रिगटातही त्यांचा समावेश करण्यात आला आहे. 2014 मध्ये मोदी सरकार अस्तित्वात आल्यानंतर इराणी यांच्याकडं मनुष्यबळ विकास खातं देण्यात आलं होतं. पण अनेक प्रकरणांमध्ये वाद झाल्यानंतर त्यांच्याकडचं हे खातं काढून वस्त्रोद्योग मंत्रालय दिलं गेलं. तर राजस्थानमध्येही वसुंधरा राजे अन् इतर नेते असे भाजपमध्येच दोन गट पडले आहेत. राजस्थानमधील सत्ता गेल्यानंतर वसुंधरा राजे यांना पक्ष संघटनेपासून दूर ठेवल्याचा आरोप त्यांच्या समर्थकांकडून केला जात आहे. 

दरम्यान, संसदेच्या पावसाळी अधिवेशनच्या आदल्यादिवशीच पेगॅसस प्रकरण बाहेर आल्याने केंद्र सरकारची डोकेदुखी वाढली आहे. इस्राईलमधील ‘एनएसओ ग्रुप’ कंपनीने पेगॅसिस स्पायवेअर तयार केला आहे. ही कंपनी केवळ सरकारलाच हे स्पायवेअर विकत देते. त्यामुळं विरोधकांनी सरकारवर जोरदार प्रहार केला आहे. 

इस्राईलमधील ‘एनएसओ ग्रुप’ कंपनीने पेगॅसिस स्पायवेअर तयार केला आहे. पॅरिस येथील ‘फॉर्बिडन स्टोरीज’ आणि अॅम्नेस्टी इंटरनॅशनल या संस्थांनी ही बाब उघडकीस आणत ५० हजार मोबाईल क्रमांकाची यादीच तयार केली. ही माहिती त्यांनी जगभरातील इतर १६ वृत्तसंस्थांना  दिली. या यादीनुसार शोध घेतल्यानंतर ५० देशांमधील एक हजारांहून अधिक जणांवर पाळत ठेवल्याबाबतचे पुरावे मिळाले. ‘एनएसओ’ने ज्यांना हे स्पायवेअर विकले होते, त्यांच्याकडूनच पाळत ठेवण्याचा प्रकार घडला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख