धमक्या मिळत असल्याने पत्नी, मुलांसमवेत लंडनमध्ये गेलेले अदर पूनावाला भारतात परतणार - SII ceo adar poonawalla return to india from london in next few days | Politics Marathi News - Sarkarnama

धमक्या मिळत असल्याने पत्नी, मुलांसमवेत लंडनमध्ये गेलेले अदर पूनावाला भारतात परतणार

वृत्तसंस्था
रविवार, 2 मे 2021

सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी देशातील बड्या व्यक्तींकडून धमक्या मिळत असल्याचा गौप्यस्फोट केला होता. 

नवी दिल्ली : जगातील सर्वांत मोठी लस उत्पादक कंपनी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी देशातील बड्या व्यक्तींकडून धमक्या मिळत असल्याचा गौप्यस्फोट केला होता. यामुळे पत्नी आणि मुलांसह ते लंडनमध्ये गेले होते.  अखेर या प्रकरणी अदर पूनावालांनी भूमिका स्पष्ट केली असून, लवकरच भारतात परतत असल्याचे सूतोवाच केले आहे. 

अदर पूनावाला यांनी ब्रिटनमधील 'द टाईम्स'ला दिलेल्या मुलाखतीवरुन मोठा गदारोळ सुरू आहे. या मुलाखतीत त्यांनी म्हटले होते की, सिरम दुसऱ्या देशात आता लस उत्पादन प्रकल्प सुरू करणार आहे. याबाबतची घोषणा पुढील काही दिवसांत होईल. माझ्या खांद्यावर सध्या मोठे ओझे आहे. भारतातील काही बड्या व्यक्ती मला धमक्या देत आहेत. कोव्हिशिल्ड लशीसाठी अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, उद्योगपती मला धमकीचे कॉल करीत आहेत. यामुळे पत्नी आणि मुलांसमवेत लंडनमध्ये आलो आहे.

यावर पूनावालांनी भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, ब्रिटनमधील भागीदारांशी अतिशय चांगली बैठक झाली. पुण्यात अतिशय वेगाने कोव्हिशिल्ड लशीचे उत्पादन सुरू आहे. लवकरच मी भारतात परत येत आहे. 

सिरमने इतर देशांसोबत लस पुरवठ्यासाठी करार केले होते. या करारानुसार या देशांना लसपुरवठा करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे इतर देशांमध्ये उत्पादन प्रकल्प सुरू करण्याचे नियोजन सिरमने केले आहे. याबद्दलची घोषणा अदर पूनावाला लवकरच करणार आहेत. 

ब्रिटनने भारतीय प्रवाशांवर बंदी घालण्याआधीच आठ दिवसांपूर्वी अदर पूनावाला लंडनमध्ये दाखल झाले आहेत. सिरमची लस उत्पादनाची क्षमता जुलैपर्यंत दरमहा 10 कोटी डोसपर्यंत जाऊ शकेल. पुढील सहा महिन्यांत सिरमची वार्षिक उत्पादन क्षमता अडीच अब्ज डोसवरुन 3 अब्ज डोसवर नेण्याचा प्रयत्न आहे, असेही पूनावालांनी म्हटले होते. 

देशात कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लशींचा वापर लसीकरणासाठी होत आहे. सिरम इन्स्टिट्यूट ही कोव्हिशिल्ड या कोरोना लशीचे उत्पादन करीत आहे. ही लस ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेन्का यांनी विकसित केली आहे. दुसरी लस ही भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही आहे. आता रशियाच्या स्पुटनिक व्ही या लशीच्या आपत्कालीन वापरासही केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख