सिद्धार्थ पीठाणीने रात्र घालवली ईडीच्या कार्यालयातच...

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूच्या तपासावरुन उठलेला गदारोळ कायम आहे. सुशांतचा मित्र सिद्धार्थ पीठाणी या प्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
siddharth pithani spends night at enforcement directorate office in mumbai
siddharth pithani spends night at enforcement directorate office in mumbai

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणी सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागानेही (सीबीआय) गुन्हा दाखल केला आहे. सुशांतचा मित्र सिद्धार्थ पीठाणी हा संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. सुशांतचा मृत्यू झाला त्यावेळी घरात उपस्थित असलेल्या चार जणांमध्ये सिद्धार्थचा समावेश आहे. ईडीने सिद्धार्थ याची 14 तासांहून अधिक काळ चौकशी केली आहे. 

सुशांतच्या मृत्यूप्रकरणी त्याचे पिता के.के.सिंह पाटण्यातील राजीवनगर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला होता. यानंतर तपासावरून महाराष्ट्र आणि बिहार सरकार एकमेकांविरोधात उभे राहिल्याचे चित्र निर्माण झाले होते. दोन राज्यांचे पोलीस या प्रकरणाचा तपास करीत असताना यात ईडीनेही उडी घेतली. सुशांतचा मृत्यू आणि आर्थिक अनियमतितेप्रकरणी ईडीने रिया हिच्यासह सहा जणांवर करचुकवेगिरी प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. सीबीआयने या प्रकरणी रिया चक्रवर्ती, तिचे पिता इंद्रजित, आई संध्या, भाऊ शोविक, सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युएल मिरांडा आणि बिझनेस मॅनेजर श्रुती मोदी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. 

सुशांतचा मित्र असलेला सिद्धार्थ पीठाणी हा क्रिएटिव्ह कंटेन्ट मॅनेजर म्हणून काम करीत होता. सुशांतचा मृत्यू झाला त्यावेळी त्याच्या घरी उपस्थित असलेल्या चार जणांमध्ये सिद्धार्थही होता. सुशांतने रिया आणि शोविकसोबत सुरु केलेल्या व्हर्च्युअल रिअॅलिटी कंपनीची जबाबदारी त्याच्यावर होती. सिद्धार्थ हा मूळचा हैदराबादमधील आहे. सुशांत हा चौकशीसाठी 10 ऑगस्टला मुंबईत आला होता. 

सिद्धार्थ याची 10 ऑगस्टला ईडीने चौकशी केली. त्यानंतर पुन्हा 11 ऑगस्टला त्याची चौकशी करण्यात आली. परंतु, चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्याने ईडीच्या कार्यालयातच थांबू देण्याची विनंती केली. लॉकडाउनमुळे हॉटेल मिळत नाही आणि शहरात इतर कोणी ओळखीचे नाही त्यामुळे ईडीच्या कार्यालयात थांबू द्यावे, असे तो म्हणाला. त्याला परवानगी देण्यात आल्यानंतर त्याने 11 ऑगस्टची रात्र ईडीच्या कार्यालयातच घालवल्यानंतर आज पुन्हा त्याची चौकशी करण्यात आली. आज चौकशी पूर्ण झाल्यानंतर तो अखेर ईडीच्या कार्यालयातून बाहेर पडला. 

रिया चक्रवर्ती हिने पाटण्यातील एफआयआर मुंबईत वर्ग करावा, यासाठी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात 11 ऑगस्टला सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी महाराष्ट्र, बिहार आणि रिया चक्रवर्ती यांना लेखी म्हणणे मांडण्याचे निर्देश दिले आहेत. यासाठी न्यायालयाने 13 ऑगस्टपर्यंत मुदत दिली आहे. सुशांत हा 14 जूनला मुंबईतील घरी मृतावस्थेत सापडला होता. याचा तपास मुंबई पोलिस करीत आहेत.या प्रकरणी पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत 56 जणांचे जबाब नोंदविले आहेत. यात सुशांतचे कुटुंबीय, त्याचे मित्र, अभिनेत्री रिया चक्रवर्ती, कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांच्यासह इतर काही जणांचा यात समावेश आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com