बिहारमध्ये शिवसेनेचा धनुष्यबाण नव्हे तर बिस्किट! - shivsena will contest bihar assembly election on biscuit symbol | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

हिवाळी अधिवेशन 14 आणि 15 डिसेंबरला मुंबईत होणार

बिहारमध्ये शिवसेनेचा धनुष्यबाण नव्हे तर बिस्किट!

वृत्तसंस्था
शनिवार, 10 ऑक्टोबर 2020

बिहार विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. महाराष्ट्रातील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह अनेक पक्ष बिहारच्या रिंगणात उतरत आहेत. 

पाटणा : शिवसेनेने बिहार विधानसभा निवडणूक लढविण्याची जय्यत तयारी सुरु केली आहे. शिवसेना बिहारमध्ये 50 जागा लढवणार आहे. मात्र, शिवसेनेला बिहार विधानसभा निवडणूक धनुष्यबाण चिन्हावर लढवता येणार नाही. कारण निवडणूक आयोगाने शिवसेनेला धनुष्यबाणाऐवजी बिस्किट हे चिन्ह दिले आहे. 

बिहार विधानसभेची मुदत २९ नोव्हेंबरला संपत आहे. एकूण तीन टप्प्यांत ही निवडणूक होत आहे. पहिला टप्पा २८ ऑक्टोबरला होणार असून, यात ७१ मतदारसंघ आहेत. दुसरा टप्पा  ३ नोव्हेंबरला असून, यात ९४ मतदारसंघ आहेत. तिसरा टप्पा ७ नोव्हेंबर असून, यात ७८ मतदारसंघ आहेत. निकाल १० नोव्हेंबरला जाहीर होणार आहेत. सत्तारुढ संयुक्त जनता दल (जेडीयू), भाजप आणि लोक जनशक्ती पक्षाच्या आघाडीविरोधात राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), काँग्रेस यांची आघाडी असे चित्र दिसत आहे.  

शिवसेना नेते अनिल देसाई यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून निवडणूक चिन्ह देण्याची मागणी केली होती. देसाई यांनी यात तीन पर्याय दिले होते. बिहारमध्ये सत्ताधारी जेडीयूचे निवडणूक चिन्ह बाण आहे. याचबरोबर झारखंड मुक्ती मोर्चाचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण आहे.  शिवसेना, झारखंड मुक्ती मोर्चा आणि जेडीयूच्या निवडणूक चिन्हांमध्ये खूप साम्य आहे. यामुळे याला जेडीयूने मागील लोकसभा निवडणुकीवेळी आक्षेप घेतला होता. त्यावेळी शिवसेना आणि झारखंड मुक्ती मोर्चाची चिन्हे निवडणूक आयोगाने जप्त केली होती. 

शिवसेना आणि झारखंड मुक्ती मोर्चामध्ये मागील विधानसभा निवडणुकीवेळी निवडणूक चिन्हांवरुन वाद झाला होता. त्यावेळी निवडणूक आयोगाने शिवसेनेला धनुष्यबाण चिन्ह दिले होते आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे चिन्ह जप्त केले होते. मागील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने 73 जागा लढवल्या होत्या आणि शिवसेनेला 2.11 लाख मते मिळाली होती. 

बिहारची निवडणूक लढवण्याबाबत शिवसेना नेते अनिल देसाई म्हणाले होते की, सुशांत सिंह राजपूत प्रकरणात विनाकारण महाराष्ट्र, मुंबई आणि शिवसेनेला बदनाम करण्यात आले. यामध्ये कोणाचा काहीही संबंध नव्हता हे लोकांना समजत होते. तरीही सूडबुद्धीचे राजकारण केले गेले. आम्ही आता बिहार निवडणूक लढवून याची परतफेड करु. बिहार निवडणुकीत आम्ही ५० जागा लढवणार आहोत. २०१५ मध्ये शिवसेना बिहारमध्ये निवडणूक लढली होती, त्यावेळी शिवसेनेला दोन लाखांपेक्षा जास्त मते मिळाली होती. 

बिहारचे माजी पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडे निवडणूक लढविण्याच्या तयारीत होते. सुशांतसिंह राजपूत प्रकरणात महाराष्ट्राची व मुंबई पोलिसांची बदनामी करणाऱ्या पांडेंविरोधात उमेदवार देण्याची तयारी शिवसेनेने केली होती. मात्र, पांडे यांना तिकीट मिळालेले नसून, त्यांनीही विधानसभा निवडणूक लढवण्याचा विचार सोडून दिला आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख