शिवसेना म्हणतेय, ईडी अन् सीबीआयला सीमेवर पाठवा...

कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सर्व प्रवेश मार्गावर आंदोलन सुरू केल्याने दिल्लीला वेढा पडला आहे. यावरुन शिवसेनेने भाजपला हल्लाबोल केला आहे.
shivsena slams bjp and central government over farmers protest in delhi
shivsena slams bjp and central government over farmers protest in delhi

नवी दिल्ली : कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या आंदोलनासाठी दिल्लीत येणाऱ्या शेतकऱ्यांनी सीमांवर रोखणे केंद्र सरकारला महागात पडले आहे. शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमांवरच ठाण मांडल्याने दिल्लीला वेढा पडल्याची स्थिती निर्माण झाली आहे. मागण्या मान्य न झाल्यास शेतकरी नेत्यांनी चार महिने दिल्लीच्या सीमांवर ठाण मांडण्याचे सूतोवाच केले आहे. शेतकऱ्यांवर  पोलिसांनी बळाचा वापर केल्याच्या मुद्द्यावर शिवसेनेने भाजपवर हल्लाबोल केला आहे.  

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात केंद्र सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे. अग्रलेखात म्हटले आहे की, लडाख आणि काश्मिरातील दुश्मनांशी आपले सैन्य लढत आहेच, पण त्या जोडीने सरकारने आपल्या ईडी, सीबीआय वगैरे यंत्रणांनाही चीन, पाकिस्तान यांच्या विरोधात जुंपावे. नाहीतरी हल्ली देशातील राजकीय विरोधकांविरोधात ईडी, सीबीआय आदी तपास यंत्रणांचा हत्यार म्हणून वापर सुरूच आहे. त्यामुळे या संस्थांना राष्ट्रीय शौर्य गाजवण्याची संधी मिळायला हवी. प्रत्येक वेळी बंदुकांनीच काम होते असे नाही. दिल्लीच्या सीमेवर आपल्याच शेतकऱ्यांना अतिरेकी ठरवून मारले जात आहे, तर कश्मीर सीमेवर अतिरेकी आमच्या सैनिकांचे बळी घेत आहेत. तेव्हा सीमेवरदेखील आता सैन्याबरोबर ईडी आणि सीबीआयला पाठवा! त्याशिवाय पर्याय नाही.

सरदार पटेल हे पोलादी पुरुष होतेच.पोलादी पुरुषाचा अतिभव्य पुतळा नरेंद्र मोदी व अमित शहा यांनी गुजरातमध्ये उभा केला. सरदार पटेल हे शेतकऱयांचे नेते होते. ब्रिटिशांविरुद्ध त्यांनी केलेली साराबंदी चळवळ, बार्डोलीचा सत्याग्रह निर्णायक ठरला, शेतकऱयांचे आंदोलन उभे करून त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीस जेरीस आणले, पण दिल्लीच्या सीमेवर आणि देशाच्या सीमेवर सध्या जो अंदाधुंद प्रकार सुरू आहे, त्यामुळे पोलादी पुरुषाच्या पुतळ्याच्या डोळ्यांच्या कडाही ओलावल्या असतील, असे अग्रलेखात म्हटले आहे.  

चीनचे सैन्य हिंदुस्थानी हद्दीत लडाखमध्ये घुसले आहे. त्याचवेळी पंजाब आणि हरयाणाच्या शेतकऱ्यांना दिल्लीच्या सीमेवर अडवून ठेवण्यात आले आहे. नुसतेच अडवले नाही, तर त्यांच्यावर बळाचा, साम- दाम-दंड-भेदाचा प्रयोग केला जात आहे. केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात पंजाब व हरयाणातील शेतकऱयांचे हे आंदोलन आहे. शेतकऱयांना दिल्लीतील रामलीला मैदानावर जायचे आहे, पण केंद्राने लाठय़ाकाठय़ा, थंड पाण्याचे फवारे, अश्रुधुराची नळकांडी फोडून त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. कडाक्याच्या थंडीत पहाटे शेतकऱयांवर थंड पाण्याचा मारा करणे हे अमानुष आहे, असे अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे. 

तरीही शेतकरी मागे हटायला तयार नाहीत. शेतकरी इतके आक्रमक व जिद्दीला कधीच पेटले नव्हते. आता शेतकरी ऐकत नाहीत व केंद्र सरकारविरोधात, पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात हंगामा करीत आहेत म्हटल्यावर भाजपने व केंद्रीय यंत्रणांनी त्यांचे नेहमीचे जंतर मंतर, जादुई हातचलाखीचे प्रयोग सुरू केले. हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी असे बेताल विधान केले की, शेतकऱयांच्या आंदोलनात खलिस्तानवादी घुसले आहेत. म्हणजेच शेतकऱयांचे आंदोलन देशद्रोही आहे. हरयाणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष ओमप्रकाश धनकड यांनी तर असाही दावा केला की, शेतकऱयांचा आंदोलनात ''पाकिस्तान झिंदाबाद''च्या घोषणा दिल्या. तशी एक क्लिपच म्हणे जारी केली. भारतीय जनता पक्षाची ही भूमिका देशातले वातावरण चिघळवणारी आहेच, पण नव्या अराजकाला आमंत्रण देणारीदेखील आहे, असा इशाराही अग्रलेखात देण्यात आला आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com