उत्तर प्रदेशात निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांवर हल्ले झाले त्यावेळी संरक्षण मंत्री कुठे होते?

अभिनेत्री कंगना राणावत हिच्या वादग्रस्त वक्तव्यावरुन राज्यात उठलेला गदारोळ कायम आहे. यातच शिवसैनिकांना निवृत्त नौदल अधिकाऱ्याला मारहाण केल्याने नवीन वाद सुरू झाला आहे.
shivsena leader sanjay raut targets bjp and defence minister rajnath singh
shivsena leader sanjay raut targets bjp and defence minister rajnath singh

मुंबई : अभिनेत्री कंगना राणावत हिने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. या वादग्रस्त वक्तव्यावरुन राज्यात उठलेला गदारोळ अद्याप संपलेला नाही. यातच शिवसैनिकांनी निवृत्त नौदल अधिकाऱ्याला मारहाण केल्याच्या प्रकरणावरून वाद सुरू आहे. राज्यात शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना रंगू लागला आहे. या निवृत्त अधिकाऱ्याला संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी कॉल केला होता. या मुद्द्यावरुन शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी संरक्षण मंत्र्यांना थेट सवाल केला आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ट पोस्ट फॉरवर्ड करणाऱ्या मदन शर्मा या निवृत्त नौदल अधिकाऱ्याला शिवसैनिकांनी मारहाण केली होती. कंगना प्रकरणावरुन शिवसेनेला लक्ष्य करणाऱ्या भाजपला यामुळे आयताच मुद्दा मिळाला आहे. भाजपने या अधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीवरुन रान उठविण्यास सुरूवात केली आहे. 

याचा समाचार आज संजय राऊत यांनी घेतला. ते म्हणाले की, महाराष्ट्र हे मोठे राज्य आहे. अशा प्रकारची घटना कोणाबाबतही घडू शकते. उत्तर प्रदेशात किती निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांवर हल्ले झाले हे तुम्हाला माहिती आहे का? परंतु, त्यांना संरक्षण मंत्री कॉल करीत नाहीत. कोणताही निष्पाप व्यक्तीवर हल्ला होऊ नये, अशी आमच्या सरकारची भूमिका आहे. 

महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे. राज्यात कायद्याचा आदर केला जातो. यामुळेच या प्रकरणातील आरोपींना आम्ही तातडीने अटक केली. ते कोणत्या पक्षाशी संबंधित आहेत याचा अजिबात विचार करण्यात आला नाही, असे राऊत यांनी स्पष्ट केले. 

कंगनाने मुंबईबाबत केलेल्या वक्तव्यावर शिवसेनेने तिला मुंबईत पाय ठेवू देणार नाही, अशा इशारा दिला होता. कंगनाविरोधात महाराष्ट्रात वातावरण तापले असल्याने केंद्रातील मोदी सरकारने तिला 'वाय' सुरक्षा दिली आहे. मुंबई महापालिकेच्या पथकाने कंगनाच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकाम पाडून टाकले होते. यावर कंगनाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करीत त्यांना लक्ष्य केले होते. 

कंगनाच्या बाजूने भाजप नेते मैदानात उतरले आहेत. ते कंगनाच्या मुद्द्यावरुन शिवसेनेला आणि राज्य सरकारला लक्ष्य करीत आहेत. कंगनाने आज राजभवनावर जाऊन थेट राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. राज्यपालांची कंगनाने भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

यावर बोलताना राऊत म्हणाले की, आम्ही कंगनाबाबत बोलणे थांबवले आहे. या प्रकरणात कोण काय करीत आहे आणि त्याचे काय परिणाम होत आहेत हे आम्ही पाहत आहोत. कोणता राजकीय पक्ष आणि व्यक्ती आपल्या महान राज्याबद्दल काय विचार करतात हेही या प्रकरणामुळे सर्वांसमोर आले आहे. 

Edited by Sanjay Jadhav 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com