..तर चंद्रकांत पाटलांच्या भाषेत भाजप 'मसणात जाईल', हे लिहून ठेवा ; शिवसेनेचा इशारा

नवाब मलिक यांच्या बाबतीतही 'वडाची साल पिंपळाला' चिकटवण्याचेच काम सुरू आहे.
..तर चंद्रकांत पाटलांच्या भाषेत भाजप 'मसणात जाईल', हे लिहून ठेवा ; शिवसेनेचा इशारा
Sanjay Raut sarkarnama

मुंबई : शिवसेनेचे नेते, राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावर गुरुवारी ईडीनं छापेमारी केली. तेरा तासांच्या चौकशीनंतर ईडीचं पथक परब यांच्या निवासस्थानाच्या बाहेर पडले. या प्रकरणावर शिवसेनेनं (Shiv Sena) टीका करीत भाजप (BJP) नेत्यांचे कान टोचले आहे. 'सामना'च्या अग्रलेखात निशाणा साधला आहे.

"राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांच्या घरी व मित्रपरिवाराकडे गुरुवारी सकाळपासून 'ईडी' नामक केंद्रीय तपास यंत्रणेचे अधिकारी छापेमारीच्या नावाखाली गेले. त्यांनी म्हणे परबांची 12 तास चौकशी केली. गेले काही दिवस, नव्हे काही महिने दापोलीतील साई रिसॉर्टशी परबांचे नाव जोडले गेले. परब यांचा कागदोपत्री पक्क्या पुराव्यांसह दावा आहे की, संबंधित रिसॉर्टशी त्यांचा संबंध नाही. तरीही त्याविषयी ईडी, केंद्रीय पर्यावरण खात्याकडून अनेक बाबतीत नियमभंग झाल्याचा बोभाटा करून परबांना 'टार्गेट' केले जात आहे हे आता स्पष्टच दिसते," असे अग्रलेखात म्हटलं आहे.

Sanjay Raut
मिलिंद नार्वेकर थेट भाजप, राष्ट्रवादीशी पंगा घेणार

"नवाब मलिक यांच्या बाबतीतही 'वडाची साल पिंपळाला' चिकटवण्याचेच काम सुरू आहे. परबांचे 'सांडपाणी' हे तर वेगळेच प्रकरण आहे. हे असेच चालू राहिले तर गंगेत प्रेते वाहून गेली तसे हे सरकार मुडद्याप्रमाणे वाहून जाईल.चंद्रकांत पाटलांच्या भाषेत 'मसणात जाईल', हे लिहून ठेवा," असा इशारा शिवसेनेनं दिला आहे.

"परब यांच्या म्हणण्यानुसार संबंधित रिसॉर्ट अद्याप सुरूच झाले नाही, मग सांडपाणी समुद्रात जाईलच कसे? रिसॉर्टचे सांडपाणी समुद्रात गेले यावर संशोधन करून ईडीने छापे मारले हे नवलच आहे. प्रश्न पर्यावरण किंवा सांडपाण्याच्या बेकायदेशीर निचऱयाचाच असेल तर ईडीने त्यांची विशेष शाखा गंगा-यमुनेच्या किनारी निर्माण करायला हवी. कोविड काळात गंगेत सांडपाणी नाही, तर सडकी प्रेते हजारोंनी वाहत होती. त्यामुळे मानवी जिवांचा आणि गंगेच्या पर्यावरणाचा प्रचंड नाश झाला. दापोलीतील रिसॉर्टच्या सांडपाण्यापेक्षा गंगेचे पूर्ण सांडपाणी त्या काळात झाले हा गंभीर गुन्हा पर्यावरणवादी ईडी किंवा सीबीआयच्या नजरेस येऊ नये हे आक्रितच म्हणावे लागेल," असे अग्रलेखात नमूद केले आहे.

Sanjay Raut
माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांना चार वर्षांचा तुरुंगवास

'दिलासा' प्रकरणही संशोधनाचाच विषय

न्यायव्यवस्था 'मेहरबान' होऊन दिलासे देत आहे. देवेंद्र फडणवीस यांचे खासमखास मींरा-भाईंदरचे आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर भ्रष्टाचारप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने गुन्हा दाखल केला. सध्या तरी प्रकरण आठ-दहा कोटींचे आहे, पण भ्रष्ट व अवैध मार्गाने जमिनी ताब्यात घेऊन त्यावर एक सप्ततारांकित क्लब या महाशयांनी उभा केला व त्यात भाजपच्या बडय़ा नेत्यांची भागीदारी (अर्थात छुपी) असल्याचे बोलले जाते. तो सगळा विषय बाहेर येतच आहे, पण भ्रष्टाचारविरोधी गुन्हा दाखल होताच हे नरेंद्र मेहता त्यांच्या पत्नीसह 'फरार' झाले व आता म्हणे त्यांना मुंबईच्या हायकोर्टाने अटकेपासून तात्पुरता दिलासा दिला आहे. त्याआधी विक्रांत निधी अपहार घोटाळाप्रकरणी किरीट सोमय्या मुलासह फरार झाले व पुढे त्यांना अटकेपासून दिलासा देण्यात आला. गुन्हा दाखल होताच फरार व्हायचे व चार-पाच दिवसांत अटकेपासून दिलासा 'गोळी' घेऊन प्रकट व्हायचे हेच सध्या सुरू आहे. ईडी, सीबीआयच्या छापेमारीप्रमाणेच हे 'दिलासा' प्रकरणही संशोधनाचाच विषय आहे.

'सामना'च्या अग्रलेखात म्हटलं आहे की..

  • केंद्रीय यंत्रणांची विश्वासार्हता कमी करण्यात आली. केंद्रीय तपास यंत्रणा म्हणजे विद्यमान भाजप सरकारच्या हातातले कळसूत्री बाहुलेच बनले की काय?

  • आता गंगेत प्रेते वाहू लागल्याने प्रदूषण झाले याबद्दल ईडी योगी आदित्यनाथांवर छापे मारणार का? केंद्रीय तपास यंत्रणांच्या सध्याच्या कारवाया या सरळ सरळ एकतर्फी व अधिकाराचा गैरवापर करणाऱया आहेत.

  • ईडी, सीबीआयचे महाराष्ट्रासारख्या राज्यांतील छापे हा आता गमतीचा विषय बनला आहे. समुद्रात सांडपाणी सोडले या सबबीखाली देशातील आर्थिक घोटाळ्य़ांचा तपास करणारी ईडीसारखी यंत्रणा छापेमारी करते.

  • भाजपचा एक बोबडा विझलेला फटाका ईडी, सीबीआयच्या नावे धमक्या देतो व त्याबरहुकूम कारवाया घडतात.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in