शिवसेनेच्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांसमोर वाचला तक्रारींचा पाढा...  - Shiv Sena MLAs read complaints before CM  | Politics Marathi News - Sarkarnama

शिवसेनेच्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांसमोर वाचला तक्रारींचा पाढा... 

मृणालिनी नानिवडेकर 
शुक्रवार, 25 सप्टेंबर 2020

कामांची यादी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे स्वत: शिवसेना आमदारांकडून मागवत असून ती कामे वेगाने  मार्गी लावण्याचे आदेश मुख्यमंत्री कार्यालयाला देण्यात येत आहेत.

मुंबई : आगामी दोन वर्षात जनतेच्या आयुष्यात गुणात्मक बदल करणाऱ्या कामांची यादी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे स्वत: शिवसेना आमदारांकडून मागवत असून ती कामे वेगाने  मार्गी लावण्याचे आदेश मुख्यमंत्री कार्यालयाला देण्यात येत आहेत.

कोविड परिस्थितीचा जिल्हावार आढावा घेतानाच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शिवसेनेच्या आमदारांच्या विभागवार बैठका सुरु केल्या आहेत. आमदारांनी निधी मिळत नाही , कामे होत नाहीत अशा तक्रारींचा पाढा वाचला असून त्याची नोंद मुख्यमंत्री कार्यालयातील आयएएस अधिकारी उध्दवजींच्याच उपस्थितीत घेत आहेत. काल उत्तर महाराष्ट्रातील सर्व सेना आमदारांची व्हर्च्युअल मिटींग झाली.  आज दुपारी विदर्भातील आमदारांशी संवाद साधला. 

आमदारांनी त्या त्या भागातील मंत्री हजर असतानाच आपल्या काय मागण्या आहेत , रेंगाळलेली कामे नेमकी कोणती याची माहिती उध्दव ठाकरे यांना देण्याच्या या मोहिमेला काल प्रारंभ झाला. उत्तर महाराष्ट्रातील गुलाबराव पाटील ,दादा भुसे या मंत्र्यांबरोबरच प्रत्येकाशी संवाद साधण्यात आला. सेनेच्या सर्व आमदारांशी संपर्क ठेवणाऱ्या एकनाथ शिंदे यांना कोरोना झाला असल्याने ते या बैठकीत नाहीत. मात्र, सध्या उध्दव ठाकरे यांच्या अत्यंत जवळ असणारे परिवहन मंत्री अनिल परब , पक्षाचे प्रतोद सुनील प्रभू आणि सेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर या बैठकीला पक्षाचे प्रतिनिधी म्हणून हजर होते. 

आमदारांची कामे कोणती, त्यात अडचणी कोणत्या हे आशीषकुमार सिंग आणि विकास खारगे या दोन सचिवांना कळवले जाते आहे. काही अडचणीच्या विषयात या अधिकाऱ्यांशी नेटवरून संपर्कही साधला जातो आहे. सहकारी पक्ष विस्ताराच्या हालचालीत आघाडी घेत असतानाच आता सेनेने आपापले मतदारसंघ मजबूत करण्याचे धोरण अंगीकारले आहे.
Edited by : Mangesh Mahale

हेही वाचा :  मुंबई वाचवण्यासाठी मैदानांखाली तळी  
  
मुंबई  : मुसळधार पावसानंतर मुंबईत पुरसदृश परिस्थिती निर्माण होते. त्यातून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. यातून सुटका करण्यासाठी मुंबई महापालिका मैदानांखाली तळी तयार करून त्यात पावसाचे पाणी साठवणार आहे. या प्रकल्पाच्या अभ्यासासाठी लवकरच समिती स्थापन करून निविदा काढण्याची शक्‍यता आहे. दरवर्षी पावसाळ्यात पाणी तुंबून मुंबई किमान दोनतीन वेळा ठप्प होते. यावर उपाय म्हणून तत्कालीन महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी जपानी पद्धतीने भूमिगत जलाशय तयार करण्याचा पर्याय सांगितला होता. त्यासाठी त्यांनी जपान इंटरनॅशनल कॉर्पोरेशन एजन्सीबरोबर चर्चाही केली होती. या प्रकल्पाच्या अभ्यासासाठी पाच कोटी रुपयांची तरतूदही महापालिकेने केली होती; मात्र एकच मोठे भूमिगत जलाशय बांधून त्यात पाणी साठवून ठेवणे खर्चिक होणार असल्याचा दावा करत पालिकेने आता जपानी प्रयोग बाजूला ठेवून दक्षिण कोरियाचा पर्याय स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार पावसाचे पाणी अडवण्यासाठी भूमिगत लहान लहान तळी करण्यात येणार आहेत. मुंबईतील मैदानांखाली तळी बांधण्याचा विचार सुरू आहे, असे महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी बुधवारी मुंबईच्या परिस्थितीचा आढावा घेऊन 'वॉटर होल्डिंग टॅंक'चा पर्याय विचारधीन आहे. त्यावर महापालिकेने काम करावे. राज्य सरकार त्यांना पाठिंबा देईल असे स्पष्ट केले आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख