ईडीच्या कारवाईनंतर सरनाईक एका मुलासमवेत क्वारंटाईन तर दुसरा मुलगा पत्नीसोबत रुग्णालयात - Shiv Sena MLA Pratap Sarnaik and his son Purvesh in quarantine | Politics Marathi News - Sarkarnama

ईडीच्या कारवाईनंतर सरनाईक एका मुलासमवेत क्वारंटाईन तर दुसरा मुलगा पत्नीसोबत रुग्णालयात

वृत्तसंस्था
बुधवार, 25 नोव्हेंबर 2020

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीची कारवाई सुरू आहे. यावरुन राज्यात मोठा गदारोळ सुरू आहे.  

मुंबई : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांचे घर आणि कार्यालयांवर सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) छापे टाकल्यानंतर मोठा गदारोळ सुरू झाला आहे. सरनाईक यांना चौकशीसाठी आज हजर राहण्यासाठी ईडीने समन्स बजावले होते. मात्र, सरनाईक हे चौकशीसाठी हजर झाले नाहीत. त्यांनी चौकशीसाठी हजर राहण्यासाठी एक आठवड्याचा कालावधी मागितला आहे, अशी माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिली. 

ईडीने आमदार सरनाईक आणि त्यांचा पुत्र विहंग यांना आज चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावले होते. मात्र, दोघेही चौकशीसाठी हजर झाले नाहीत, अशी माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिली. ईडीने काल एकूण 10 ठिकाणी छापे टाकले आहेत. त्यात प्रताप सरनाईक यांचे घर, मुलांचे घर, कार्यालये ही ठिकाणे होती. परदेशात पैसे पाठवल्याप्रकरणी हे छापे टाकण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. 

प्रताप सरनाईक यांच्या मेहुण्याने ईडीला या संदर्भात पत्र दिले आहे. यात चौकशीसाठी हजर राहण्यास एक आठवड्याला कालावधी त्यांनी मागितला आहे. सरनाईक हे बाहेरुन मुंबईत आल्याने त्यांना नियमानुसार क्वारंटाइन करण्यात आले आहे. याचवेळी प्रताप सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश यांनाही क्वारंटाइन करण्यात आले आहे. दुसरे पुत्र विहंग यांची पत्नी हायपरटेन्शनमुळे रुग्णालयात दाखल असून, ते पत्नीसमवेत रुग्णालयात थांबले आहेत. 

सरनाईक यांचे मेहुणे आज हे पत्र घेऊन ईडीच्या कार्यालयात आले होते. प्रताप सरनाईक आणि विहंग यांना आज सकाळी 11 वाजता चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले होते. दोघांनाही चौकशीसाठी हजर राहण्यास एक आठवड्यांचा कालावधी द्यावा, अशी मागणी पत्रात करण्यात आली आहे. 

आमदार सरनाईक यांचे मुंबई तसेच ठाणे येथील कार्यालये आणि घरावर ईडीने काल छापा टाकत कारवाई केली होती. दहा ठिकाणी छापा टाकून कारवाई केल्यानंतर सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश आणि विहंग यांच्या घरीदेखील ईडीचे पथक पोचले होते. त्यानंतर ईडीने विहंग सरनाईक यांची चौकशी सुरू केली होती. 

ईडीने सरनाईक यांचे पुत्र विहंग यांची काल पाच तास कसून चौकशी केली आहे. चौकशी झाल्यानंतर ते ठाण्याला रवाना झाले होते. विहंग यांची आज पुन्हा चौकशी होणार होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडीने विहंग सरनाईक यांची आज ५ तास चौकशी केली. त्यांच्याकडून १० कंपन्यांसंदर्भातील प्राथमिक माहिती घेण्यात आली आहे. त्यांच्याशी संबंधित कंपन्यांचे सगळे व्यवहार तपासले जाणार आहेत. त्यामुळे उद्या पुन्हा एकदा त्यांनी चौकशीसाठी बोलावले जाण्याची शक्यता आहे. आज छाप्यात जप्त केलेल्या कागदपत्रांच्या अभ्यास करून पुन्हा एकदा यासंदर्भात प्रश्नावली तयार करून चौकशी होणार आहे. 

ईडीने सकाळी घरावर छापे टाकल्यानंतर आमदार सरनाईक यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली होती. ईडीने आमच्यावर छापे का टाकले हे मलाच माहीत नाही. मी या कारवाईबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. या छाप्यांप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्याबाबत विचार सुरू आहे, असे त्यांनी सांगितले होते. 

या कारवाईमुळे शिवसेनेचे नेते प्रचंड संतापले असून त्यांनी भाजप आणि केंद्रातील मोदी सरकारवर टीका करायला सुरुवात केली आहे. सरनाईक हे अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात आक्रमक होते. रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यावर हक्कभंगाचा प्रस्ताव आणण्याची नोटीसही सरनाईक यांनीच दिली होती. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख