अठ्ठ्याऐंशी वर्षांच्या 'मेट्रोमॅन'च्या राजकीय इनिंगवर थरूर म्हणतात, या वयात अवघडच! - shashi tharoor says metro man sreedharan polictical impact will be minimal | Politics Marathi News - Sarkarnama

अठ्ठ्याऐंशी वर्षांच्या 'मेट्रोमॅन'च्या राजकीय इनिंगवर थरूर म्हणतात, या वयात अवघडच!

वृत्तसंस्था
रविवार, 21 फेब्रुवारी 2021

मेट्रोमॅन ई.श्रीधरन हे भाजपच्या वाटेवर आहेत. त्यांनी अद्याप भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला नसला तरी मुख्यमंत्रिपदावर दावा सांगितला आहे. 

नवी दिल्ली : मेट्रोमॅन ई.श्रीधरन हे आता राजकीय इनिंग सुरू करीत आहेत. ते भाजपच्या वाटेवर आहेत. त्यांचा भाजप प्रवेश पुढील आठवड्यात होणार आहेत. मात्र, भाजपमध्ये प्रवेश करण्याआधीच मुख्यमंत्रिपदाचा दावेदार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यावर काँग्रेस नेते शशि थरुर यांनी प्रतिक्रिया दिली असून, श्रीधरन यांच्या वयाचा मुद्दा उपस्थित केला आहे. 

ई.श्रीधरन हे पुढील आठवड्यात भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केरळमधील राजकीय वातावरण तापले आहे. राजकीय इनिंग सुरू होण्याआधीच श्रीधरन यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पक्षात प्रवेश करण्याआधीच त्यांनी मुख्यमंत्रिपदावर दावा केल्याने भाजपमधील काही नेतेही खासगीत नाराजी व्यक्त करीत आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

प्रदेशाध्यक्ष सुरेंद्रन यांनीच श्रीधरन हे पक्षात प्रवेश करणार असल्याबाबतची घोषणा केली होती. श्रीधरन यांनीही त्यास दुजोरा दिला होता. या पार्श्‍वभूमीवर श्रीधरन म्हणाले होते की, भाजपची इच्छा असल्यास मी केरळ विधानसभा निवडणूक लढेन. तसेच, पक्षाने विचारल्यास मुख्यमंत्रिपद स्वीकारण्यासही माझी तयारी आहे. केरळमध्ये भाजप सत्तेवर आल्यास पायाभूत सुविधांच्या विकासावर लक्ष केंद्रित केले जाईल. याचबरोबर राज्याला कर्जमुक्त करण्यावर भर दिला जाईल. 

याबाबत बोलताना शशि थरुर यांनी श्रीधरन यांच्या वयाचा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, मी वयाच्या 53 वर्षी राजकारणात प्रवेश केला. त्यावेळी मला उशीर झाला, असे वाटत होते. मी कितपत काम करु शकेन, अशीही शंका होती. मी 88 वर्षांच्या व्यक्तीबद्दल काय सांगू शकतो. त्यांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. त्यांच्या भाजप प्रवेशाचा अतिशय कमी परिणाम राज्यातील राजकारणावर झालेला दिसेल. 

हेही वाचा : मेट्रोमॅन होऊ शकतात केरळचे मुख्यमंत्री...

मागील विधानसभा निवडणुकीत भाजपला केवळ एक जागा मिळाला होती. आताही भाजपच्या कामगिरीत फार मोठी सुधारणा होणार नाही. श्रीधरन यांच्या राजकारणात येण्याच्या घोषणेमुळे मीसुद्धा आश्चर्यचकित झालो आहे. त्यांना अभियांत्रिकी प्रकल्प पूर्ण करण्याचा अनुभव आहे. परंतु, धोरणांची अंमलबजावणी करण्याचा कोणताही अनुभव नाही. राजकारण हे अतिशय वेगळे आहे, असेही थरुर यांनी म्हटले आहे. 

केरळमध्ये एप्रिल-मे महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. मुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्या ८८ वर्षांच्या श्रीधरन यांनी राज्यपालपदात कोणताही रस नसल्याचे सांगितले आहे. राज्यपाल हे पद संपूर्णपणे घटनात्मक आहे. या पदावरून राज्याच्या विकासासाठी भरीव कार्य करता येणार नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. 

केरळमध्ये सध्या डाव्यांच्या लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंटचे (एलडीएफ) सरकार आहे. काँग्रेसप्रणित युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (यू़डीएफ) विरोधात आहे. मागील अनेक वर्षे राज्यात या दोन्ही आघाड्यांकडे सत्ता राहिली आहे. राज्यात भाजपचे स्थान अगदी नगण्य आहे. श्रीधरन यांनी पक्षात प्रवेश केल्यास फायदा होईल, असा भाजपचा कयास आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख