शरद यादवांची कन्या काँग्रेसमध्ये...बिहारमध्ये उतरणार रिंगणात

बिहारमधील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. आता राज्यात पक्षांतराचे वारे सुरू झाले आहे.
sharad yadav daughter subhashini raj rao joins congress
sharad yadav daughter subhashini raj rao joins congress

पाटणा : बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला जोर चढला आहे. राजकीय पक्षांमध्ये दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांना ओढून घेण्याची चुरस लागली आहे. आता लोक तांत्रिक जनता दलाचे अध्यक्ष शरद यादव यांच्या कन्येने काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसकडून त्यांना विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जाणार आहे. 

बिहार विधानसभेची निवडणूक तीन टप्प्यांत होत आहे. पहिला टप्पा २८ ऑक्टोबरला होणार असून, यात ७१ मतदारसंघ आहेत. दुसरा टप्पा  ३ नोव्हेंबरला असून, यात ९४ मतदारसंघ आहेत. तिसरा टप्पा ७ नोव्हेंबर असून, यात ७८ मतदारसंघ आहेत. निकाल १० नोव्हेंबरला जाहीर होणार आहेत. बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत सत्तारुढ संयुक्त जनता दल (जेडीयू) आणि भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात (एनडीए) राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), काँग्रेस आणि डावे यांची महाआघाडी असे चित्र आता स्पष्ट झाले आहे. 

एनडीएमधून लोक जनशक्ती पक्ष (एलजेपी) बाहेर पडला आहे. चिराग पासवान यांनी राष्ट्रीय स्तर आणि लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत राहण्याची भूमिका घेतली आहे. परंतु, बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पातळीवर जेडीयूसोबत वैचारिक मतभेद असल्याचे कारण देत स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.  

जेडीयूच्या स्थापनेपासून अध्यक्षपदी राहिलेले शरद यादव नंतर पक्षातून बाहेर पडले होते. त्यांनी लोक तांत्रिक जनता दलाची स्थापना केली होती. त्यांची मुलगी सुभाषिनी राज राव यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. दिल्लीत काँग्रेस मुख्यालयात हा कार्यक्रम झाला. त्यांना बिहारीगंज मतदारसंघातून तिकिट मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 

हरियानातील एका राजकीय परिवाराची सून असलेल्या सुभाषिनी राज राव यांनी याआधी मुख्यमंत्री नितीशकुमार यांना लक्ष्य केले होते. सुभाषिनी यांनी मागील लोकसभा निवडणुकीवेळी मधेपुराचा दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी नितीशकुमार यांना लक्ष्य केले होते. शरद यादव हे त्यावेळी मधेपुरातून निवडणूक लढत होते. मात्र, त्यांचा पराभव झाला होता. 

बिहारमधील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) आणि महाआघाडीला टक्कर देण्यासाठी ग्रँड डेमोक्रॅटिक सेक्युलर फ्रंट स्थापन करण्यात आला आहे. राष्ट्रीय लोक समता पक्षाचे उपेंद्र कुशवाह हे फ्रंटचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार आहेत. यात ओवेसी यांचा ऑल  इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल मुसलमीन (एआयएमआयएम), मायावती यांचा बहुजन समाज पक्ष (बसप), सुहेलदेव भारतीय समाज पार्टी, सामाजिक जनता दल (डेमोक्रॅटिक) आणि जनतांत्रिक पार्टी (सोशालिस्ट) समावेश आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com