Sharad Pawar Resigns : शरद पवार विचार करूनच निर्णय घेतात; तारिक अन्वरांनी सांगितला अनुभव
Tariq Anwar and Sharad Pawar : शरद पवार यांनी मंगळवारी (ता. २) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले. त्यावर पवार यांचे माजी सहकारी आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तारिक अन्वर यांनी पवार हे विचार करूनच निर्णय घेत असल्याचे सांगितले. तसेच पवारांनी भविष्याची योजना तयार केलेली असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
काँग्रेस पक्षातून शरद पवार, पी.ए. संगमा आणि तारिक अन्वर (Tariq Anwar) बाहेर पडले. त्यांनतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. त्यावेळेपासून शरद पवार हे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. आता पवार यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले आहे.
पवारांच्या या घोषणेवर तारिक अन्वर म्हणाले, "शरद पवार (Sharad Pawar) देशातील अनुभवी, मोठे नेते आहेत, यात काहीच शंका नाही. त्यांच्या निवृत्तीच्या घोषणेचे काय कारण आहे, याबाबत पवार कुटुंबीय सांगू शकतात. त्यांनी कोणत्या परिस्थितीत पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचे जाहीर केले, त्यांची पुढील काय योजना आहे, ही त्यांच्या पक्षाची अंतर्गत बाब आहे. ते राष्ट्रवादी पक्षाची स्थापना झाल्यापासून राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.महाराष्ट्राच्या राजकारणावर त्यांचे मोठे वर्चस्व आहे. त्यामुळे पायउतार होण्याचा घेतलेला निर्णय मोठा आहे."
अन्वर यांनी पवार अनुभवी आणि विचार करून निर्णय घेणारे नेते असल्याचेही स्पष्ट केले. अन्वर म्हणाले, "आता पवारांनी कोणत्या स्थितीत निर्णय घेतला याबाबत तेच खुलासा करू शकतात. सर्व गोष्टी त्यांच्या समोरच घडलेल्या आहेत. शरद पवार कुठलाही निर्णय घेताना पूर्ण विचार करतात. त्यानुसारच आताचा निर्णयही त्यांनी विचार करूनच घेतला असेल. तसेच त्यांच्या कुटुंबातील कुठलाही वाद असल्याचे समोर आले नाही. आता अजित पवार आणि इतर नेते ठरवून राष्ट्रीय अध्यक्ष ठरवतील."
देशाच्या राजकारणात (Politics) पवारांची प्रमुख भूमिका असल्याचेही अन्वर यांनी यावेळी सांगितले. अन्वर म्हणाले, "देशाच्या राजकारणात त्यांनी मोठी भूमिका बजावली आहे. त्यांनी विरोधकांचा आवाज म्हणून भूमिका बजावली आहे. आजही ते विरोधी पक्षांच्या ऐक्यासाठी काम करत आहेत. त्यांचा देशात मोठा जनसंपर्क आहे. वेळ पडेल त्यावेळी त्यांनी विरोधकांना कमी वेळेत एकत्र आणण्याचे काम केले आहे."
कोण आहेत तारिक अन्वर
१४ मार्च १९९८ रोजी सोनिया गांधी यांची काँग्रेसच्या पक्षाध्यक्ष म्हणून निवड झाली. त्यानंतर १९९९ मध्ये शरद पवार, तारिक अन्वर आणि पी. ए. संगमा बाहेर पडले. त्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. दरम्यान, २०१८ मध्ये अन्वर पुन्हा काँग्रेसमध्ये गेले. सध्या ते केरळ आणि लक्षद्वीपचे प्रभारी महासचिव आहेत.
(Edited by Sunil Dhumal)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.