माझ्या आईवर माझे प्रेम असून, तिला फाशी नका देऊ..! - shabnams son appeals to president to commute her death sentence | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शिवसेनेचे नेते शेखर गोरे यांच्यासह सहा जणांवर म्हसवड पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे

माझ्या आईवर माझे प्रेम असून, तिला फाशी नका देऊ..!

वृत्तसंस्था
शुक्रवार, 19 फेब्रुवारी 2021

घरातील सात जणांची हत्या करणाऱ्या महिलेला फाशीची शिक्षा झाली आहे. आता तिच्या मुलाने दयेसाठी याचना केली आहे. 

लखनऊ : प्रियकराच्या मदतीने घरातील सात जणांची हत्या करणाऱ्या शबनमला फाशीची शिक्षा झाली आहे. फाशी न देण्याची मागणी करणारी दया याचिका तिने राज्यपालांकडे केली आहे. याचबरोबर आता तिच्या मुलाने थेट राष्ट्रपतींकडे दयेची याचना केली आहे. राष्ट्रपतींवर पूर्ण विश्वास असल्याचे त्याने म्हटले आहे.

उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्हा न्यायालयाने शबनमला २०१० मध्ये फाशीची शिक्षा सुनावली आहे. त्यानंतर उच्च न्यायालयानेही शबनमची शिक्षा कायम ठेवली होती. तिच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली होती. पण ती याचिकाही न्यायालयाने फेटाळून लावत शिक्षा कायम ठेवली होती. त्यानंतर राष्ट्रपतींनीही ११ ऑगस्ट २०१६ रोजी दया याचिका नामंजूर केली होती. 

शबनमचा मुलगा महम्मद ताज याने आता थेट राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे दयेची याचना केली आहे. त्याने 'दया' असा शब्द लिहिलेली पाटी हातात धरुन प्रसारमाध्यमांच्या राष्ट्रपतींना आवाहन केले आहे. त्याने म्हटले आहे की, माझ्या आईवर माझे प्रेम आहे. तिची फाशीची शिक्षा माफ करावी, अशी मागणी मी राष्ट्रपतींकडे करीत आहे. आता माफ करण्याचा निर्णय राष्ट्रपतीच घेऊ शकतात. परंतु, माझ्या त्यांच्यावर विश्वास आहे. 

स्वतंत्र भारताच्या इतिहासात एका महिला आरोपीला पहिल्यांदाच फाशी दिली जाणार आहे. घरातील सात जणांच्या हत्येचा आरोप असलेल्या शबनम नावाच्या महिलेला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. तिला फाशी देण्याची तयारी मथुरा कारागृह प्रशासनाने सुरू केली आहे. अद्याप फाशीचा दिवस ठरला नसला तरी त्यादृष्टीने सर्व जुळवाजुळव सुरू झाली आहे. त्यातच शबनमने वकिलांमार्फत कारागृह प्रशासनाकडे दया याचिका केली आहे. प्रशासनाकडून ही याचिका राज्यपालांकडे पाठविली जाईल. उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यावर निर्णय घेतील. 

काय आहे प्रकरण?

शबनम ही अमरोहा येथील आहे. तिचे व एका तरुणाचे प्रेमसंबंध होते. त्याला घरच्यांकडून विरोध होता. या रागातून तिने प्रियकराच्या मदतीने २००८ मध्ये घरातील सात जणांची कुऱ्हाडीने निघृण हत्या केली. त्यामध्ये तिचे वडील, आई, दोन भाऊ, वहिनी आणि तिच्या बहिणाचा समावेश होता. त्यानंतर तिने १० महिन्यांच्या बाळाचीही हत्या केली. सलीम असे तिच्या प्रियकराचे नाव आहे. यावेळी ती गर्भवती होती. तुरूंगात असताना तिला मुलगा झाला. 

मथुरेत दिली जाणार फाशी

महिलांना फाशी देण्याची व्यवस्था केवळ मथुरा येथील कारागृहात आहे. स्वातंत्र्यापूर्वीच इथेच महिलांना फासावर लटकवले जात होते. पण स्वातंत्र्यानंतर अद्याप एकाही महिला आरोपीला फाशी दिली गेली नाही. त्यामुळे शबनम ही स्वातंत्र्यानंतर फासावर जाणारी देशातील पहिली महिला आरोपी ठरणार आहे. तिथे फाशी देण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. शबनमचा प्रियकर सलीमलाही फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सध्या शबनम बरेली कारागृहात तर सलीम आग्रा येथील कारागृहात आहे. 

शबनमकडे दोन पदव्या...

शबनमने इंग्रजी व भुगोल विषयात एमएची पदवी मिळविली आहे. हत्या करण्यापूर्वी ती गावातील प्राथमिक शाळेत शिकवत होती. तर सलीमने सहावीतूनच शाळा सोडून दिली आहे. तो शबनमच्या घराजवळ असलेल्या एका लाकडाच्या वखारीत काम करत होता. हत्या केल्यानंतर पोलिसांनी त्यांना पाच दिवसांतच अटक केली होती.

Edited by Sanjay Jadhav 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख