बंगळूर : कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांना रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारामुळे पक्षांतर्गत विरोध दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र होते. यामुळे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी नुकतीच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेऊन मंत्रिमंडळ विस्तारावर शिक्कामोर्तब करुन घेतले होते. अखेर येडियुरप्पांनी सात आमदारांना कॅबिनेट मंत्रिपदाची गुड न्यूज दिली आहे.
कर्नाटकातील मंत्रिमंडळ विस्ताराचे भिजत घोंगडे मागील वर्षभरापासून कायम होते. यामुळे अनेक नेते नाराज होते. मंत्रिपदासाठी इच्छुक असलेले नेते अस्वस्थ झाले असून, ते मुख्यमंत्री येडियुरप्पा आणि सरकारला लक्ष्य करीत होते. सध्या मंत्रिमंडळात 27 मंत्री असून, एकूण क्षमता 34 पर्यंत वाढवता येऊ शकते.
शहा, नड्डांची भेट झाली अन् येडियुरप्पा म्हणाले, आता लवकरच गुड न्यूज!
अखेर मंत्रिमंडळ विस्तार येडियुरप्पांनी आज जाहीर केला. त्यांनी म्हटले आहे की, एमटीबी नागराज, उमेश कत्ती, अरविंद लिंबावली, मुरूगेश निरानी, आर. शंकर, सी.पी.योगेश्वर, अंगारा एस. यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले आहे. ते आजच मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. या नव्या मंत्र्यांच्या नावांची यादी राज्यपालांना पाठवण्यात आली आहे. त्यांचा शपथविधी दुपारी 3.30 वाजता होईल.
मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी नुकतीच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. या बैठकीला कर्नाटकचे प्रभारी अर्जुनसिंह हे सुद्धा उपस्थित होते. या बैठकीनंतर बोलताना येडियुरप्पा म्हणाले होते की, आमची मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सविस्तर चर्चा झाली आहे. आमची चर्चा ही सकारात्मक आणि फलदायी ठरली आहे. लवकरच अंतिम नावांवर शिक्कामोर्तब होईल. या चर्चेबद्दल मी समाधानी आहे. मला आता केवळ सूचनांची प्रतिक्षा आहे. तुम्हाला लवकरच गुड न्यूज मिळेल.
मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल पक्ष नेतृत्वासोबत ही शेवटचीच बैठक का, असे विचारल्यावर येडियुरप्पा म्हणाले होते की, अगदी 101 टक्के ही शेवटची बैठक आहे. ते लवकरात लवकर नावे निश्चित करतील. मी काही नावे सुचवली आहेत. त्यावर नेतृत्व सकारात्मक विचार करेल, अशी आशा मला आहे.
मंत्रिपदाच्या शर्यतीत असलेल्या नेत्यांमध्ये आमदार उमेश कत्ती, मुनिरत्न, बसनगौडा पाटील-यतनाळ, एम.पी.रेणुकाचार्य, अरविंद लिंबावली आणि एस.आर. विश्वनाथ यांचा समावेश आहे. याचबरोबर विधान परिषदेचे आमदार असलेले सी.पी.योगेश्वर, एम.टी.बी.नागराज आणि आर.शंकर यांचीही नावे आघाडीवर होती.
राज्यात भाजपला येडियुरप्पा यांच्याशिवाय पर्याय नसल्याचे चित्र आहे. येडियुरप्पा यांना दुखावणे भाजप नेतृत्वाला परवडण्यासारखे नाही. यातच त्यांचा कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत तेच मुख्यमंत्री राहतील, अशी हमीही नुकतीच पक्ष नेतृत्वाने दिली आहे.
Edited by Sanjay Jadhav

