ग्रामीण भागात लसीकरणासाठी अदर पूनावालांचं मोठं पाऊल...

भारतामध्ये प्रामुख्याने सिरम इन्स्टिट्यूटने उत्पादित केलेली कोविशिल्ड आणि भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन या दोन लशी उपलब्ध आहेत.
Serum Institue and CII join hands for vaccination
Serum Institue and CII join hands for vaccination

नवी दिल्ली : ग्रामीण भागामध्ये कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी सिरम इन्स्टिट्यूटनं (SII) महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी भारतातील उद्योगांची शिखर संघटना असलेल्या कॉन्फडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (CII) शी करार करण्यात आला आहे. या कराराच्या माध्यमातून देशातील ग्रामीण भाग आणि छोट्या शहरांमध्ये लसीकरण वाढविण्यावर भर देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. (Serum Institue and CII join hands for vaccination)

भारतामध्ये प्रामुख्याने सिरम इन्स्टिट्यूटने उत्पादित केलेली कोविशिल्ड आणि भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन या दोन लशी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. आतापर्यंत सुमारे 45 कोटी नागरिकांना लशीचा किमान एक डोस देण्यात आलेला आहे. डिसेंबर अखेरपर्यंत देशातील प्रत्येकाचे लसीकरण करण्याचे केंद्र सरकारचे उद्दिष्ट आहे. त्यानुसार लशींचा पुरवठा वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सिरमकडूनही उत्पादन वाढवण्यावर भर दिला जात आहे. 

सिरमशी केलेल्या कराराविषयी बोलताना CII चे अध्यक्ष टी. व्ही. नरेंद्रन म्हणाले, अधिकाधिक नागरिकांचे लवकरात लवकर लसीकरण करण्यावर देशातील विकासाची गती आणि आर्थिक उलाढाल अवलंबून आहे. CII कडून लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी समाजासह रुग्णालये आणि उद्योग क्षेत्राला जोडण्याचे लक्ष्य आहे. सिरमच्या सहभागामुळे ते अधिक वेगाने होऊ शकेल.

अदर पूनावाला यांनीही या कराराविषयी आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, 'वितरणासाठी कोविशिल्ड लशीचे अनेक डोस उपलब्ध आहेत. CII शी भागीदारी केल्यानं लसीकरणातील दरी कमी होईल.' देशात 23 जुलैपर्यंत CII मार्फत सुमारे 35 लाख लोकांना लशीचा किमान एक डोस देण्यात आला आहे. त्याला गती देण्यासाठी CII कडून राज्यनिहाय गरज बघून शिबीरांचे नियोजन केले जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने ग्रामीण भाग आणि छोट्या शहरांवर लक्ष्य दिले जाणार आहे. 

दरम्यान, कोरोना लसीकरणासाठी ओळखपत्र बंधनकारक असल्याचे सांगितले जाते. पण देशभरात आतापर्यंत तब्बल 3 लाख 83 हजार जणांना कोणत्याही ओळखपत्राशिवाय लस देण्यात आल्याचा खुलासा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी लोकसभेत केला आहे. लसीकरणासाठी कोविन पोर्टलच्या माध्यमातून पूर्वनोंदणी करणे आवश्यक आहे. तसेच थेट लसीकरण केंद्रावर जाऊनही नोंदणी करता येते. पण तिथे गेल्यानंतर कोविन पोर्टल नोंदणी करूनच लस दिली जाते. त्यासाठी कोणतेही एक ओळखपत्र मागितले जाते. पण ओळखपत्राशिवायही लाखो जणांना लस देण्यात आल्याचे स्पष्ट झालं आहे. भारती पवार यांनीच याबाबतची माहिती लोकसभेत दिली आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com