शशिकलांना नेमका संसर्ग कशाचा हे कळेना...अद्याप सीटी स्कॅनही नाही!

शशिकला यांची या महिन्यात कारागृहातून सुटका होत आहे. त्यांच्या सुटकेनंतर राज्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत.
sasikala tests covid19 negative but cause of infection is unknown
sasikala tests covid19 negative but cause of infection is unknown

नवी दिल्ली : तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिला यांच्या निकटवर्ती व अण्णाद्रमुक पक्षाच्या नेत्या व्ही.के.शशिकला यांच्या सुटकेला सुमारे आठवड्याचा कालावधी राहिलेला असताना त्यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. त्यांना काल (ता.२०) उपचारासाठी तातडीने बंगळूरमधील रुग्णालयात हलवण्यात आले होते. त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली असून, त्यांना नेमका कशाचा संसर्ग झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अद्याप त्यांचे सीटी स्कॅनही करण्यात आले नसल्याचे समोर आले आहे. 

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी शशिकला यांना चार वर्षे तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. त्या 15 फेब्रुवारी 2017 रोजी तुरुंग अधिकाऱ्यांसमोर शरण आल्या होत्या. त्या कर्नाटकातील पराप्पना अग्रहार कारागृहात आहेत. शशिकला यांची शिक्षेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर 27 जानेवारीला सुटका होईल, अशी शक्यता आहे. त्याआधीच त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. याचबरोबर राज्यातील राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे.   

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शशिकला या 27 जानेवारीला कारागृहातून बाहेर पडत आहेत. त्यांना काल अचानक कारागृहात त्रास जाणवू लागला. त्यांना ताप आला असून, त्यांना श्वास घेण्यासही त्रास होत आहे. त्यांना बंगळूरमधील बावरींग सरकारी रुग्णालयात तातडीने हलवण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

शशिकलांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्यांच्या श्वसनमार्गाला संसर्ग झाला असून, या संसर्गाचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. त्यांना कृत्रिम ऑक्सिजन देण्यात येत आहे. त्यांचे सीटी स्कॅन अद्याप करण्यात आलेले नसून, याबद्दल त्यांच्या कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

शशिकलांच्या सुटका होण्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरणात अस्वस्थता निर्माण झाली आहे. विशेषत: अण्णाद्रमुक पक्षात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे आहेत. शशिकलांच्या सुटकेमुळे राज्यात बदलणाऱ्या राजकीय समीकरणांचा धसका मुख्यमंत्री एडापड्डी के. पलानीस्वामी आणि उपमुख्यमंत्री ओ.पनीरसेल्वम यांनी घेतला आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या गटांनी एकत्र येऊन शशिकलांच्या विरोधात रणनीती आखण्यास सुरवात केली आहे.

कारागृहात शिक्षा भोगण्यासाठी जाण्याआधी शशिकलांनी विश्वासू सहकारी असलेले पलानीस्वामी यांना मुख्यमंत्रिपदी बसवले होते. नंतर तेच शशिकलांच्या विरोधात गेले. आता त्यांनी थेट शशिकलांना आव्हान दिले आहे. दिल्लीत बोलताना पलानीस्वामी म्हणाले होते की, शशिकलांना आम्ही अण्णाद्रमुध्ये प्रवेश देणार नाही. शशिकला म्हणजे काय पक्ष आहेत का? त्यांच्या सुटकेने काहीही फरक पडणार नाही. टी.टी.व्ही. दिनकरन यांच्या पक्षातील बहुतांश नेते आता अण्णाद्रमुकमध्ये परतले आहेत. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com