पोलिसांच्या पाठबळावरच काँग्रेसच्या गुंडांनी केला बादल यांच्या हत्येचा प्रयत्न! - SAD says congress goons attacks sukhbir singh badal with police support | Politics Marathi News - Sarkarnama

पोलिसांच्या पाठबळावरच काँग्रेसच्या गुंडांनी केला बादल यांच्या हत्येचा प्रयत्न!

वृत्तसंस्था
मंगळवार, 2 फेब्रुवारी 2021

पंजाबमध्ये स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीवरुन वातावरण तापले आहे. आता शिरोमणी अकाली दलाचे सुखबीरसिंग बादल यांच्यावर हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे. 

चंडीगड : पंजाबमध्ये स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीवरून वातावरण तापले आहे. जलालाबादमध्ये शिरोमणी अकाली दल आणि कॉंग्रेस कार्यकर्ते यांच्यात आज जोरदार धुमश्‍चक्री उडाली. या वेळी शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीरसिंग बादल यांच्यावर हल्ला करुन त्यांच्या मोटारीची तोडफोड करण्यात आली. दरम्यान, पोलिसांच्या पाठबळावरच बादल यांच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आल्याचा गंभीर आरोप अकाली दलाने केला आहे.  

पंजाबमध्ये १४ फेब्रुवारीला ८ महानगरपालिका, १०९ नगरपालिका आणि नगर पंचायतीच्या निवडणुका होत आहेत. यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. जलालाबादमध्ये निवडणुकीसाठी मंगळवारी अकाली दलाचे उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी आले होते. त्यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी विरोध केल्यानंतर दोन्ही गटांत जुंपली. 

या वेळी सुखबीरसिंग बादल यांच्या मोटारीवर हल्ला करण्यात आला. यातून बादल बचावले असून, याबद्दल बोलताना अकाली दलाचे प्रवक्ते दलजितसिंग चीमा यांनी म्हटले आहे की, पोलिसांच्या पाठबळावर काँग्रेसच्या गुंडांनी बादल यांच्यावर हल्ला केला. बादल यांना वाचवण्यासाठी पुढे आलेल्या अकाली दलाच्या तीन कार्यकर्त्यांना गोळ्या लागल्या आहेत. राज्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली असून, मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी राजीनामा द्यायला हवा. याचबरोबर या घटनेची चौकशी पंजाब व हरियाना उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांच्या देखरेखीखाली व्हावी. मुख्यंत्री अमरिंदरसिंग यांच्या काळात राज्यात लोकशाहीची हत्या सुरू आहे. 

या प्रकरणी सुखबीरसिंग बादल यांनी काँग्रेसचे आमदार रमिंदरसिंग अवला यांचे कुटुंबीय आणि पोलिसांना जबाबदार धरले आहे. ते म्हणाले की, नियोजनबद्धरीतीने अकाली दलाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला करण्यात आला. हिंसाचारात अकाली दलाच्या तीन कार्यकर्त्यांना गोळी लागली आहे. हा गोळीबार आमदाराच्या मुलाने केला आहे. यादरम्यान पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. 

शिरोमणी अकाली दलाचे नेते वरदेव सिंग मान यांच्या नेतृत्वाखाली अकाली दलाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या विरोधात आंदोलन केले होते. अकाली दलाच्या आरोपानुसार, नगर परिषद निवडणुकीसाठी त्यांचे उमेदवार अर्ज भरण्यासाठी कार्यालयात जात असताना त्यांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी आणि पोलिसांनी अडवले. सरकारी कार्यालयापर्यंत त्यांना जाऊ दिले नाही. त्याचे पर्यवसान आजच्या हाणामारीत झाले. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख