सुखबीरसिंग बादल यांच्यावर हल्ला; काँग्रेस-अकाली दलात धुमश्‍चक्री - sad president sukhbir singh badal vehicle attacked in punjab | Politics Marathi News - Sarkarnama

सुखबीरसिंग बादल यांच्यावर हल्ला; काँग्रेस-अकाली दलात धुमश्‍चक्री

वृत्तसंस्था
मंगळवार, 2 फेब्रुवारी 2021

पंजाबमध्ये स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीवरुन वातावरण तापले आहे. आता शिरोमणी अकाली दलाच्या सुखबीरसिंग बादल यांच्यावर हल्ला झाला आहे. 

चंडीगड : पंजाबमध्ये स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीवरून वातावरण तापले आहे. जलालाबादमध्ये शिरोमणी अकाली दल आणि काँग्रेस कार्यकर्ते यांच्यात आज जोरदार धुमश्‍चक्री उडाली. आज दोन्ही गट समोरासमोर आले आणि दगडफेक, लाठीमारासोबत हवेत गोळीबारही झाला. या वेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीरसिंग बादल यांच्यावर हल्ला करुन त्यांच्या मोटारीची तोडफोड केली.

पंजाबमध्ये १४ फेब्रुवारीला ८ महानगरपालिका, १०९ नगरपालिका आणि नगर पंचायतीच्या निवडणुका होत आहेत. यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. जलालाबादमध्ये निवडणुकीसाठी मंगळवारी अकाली दलाचे उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी आले होते. त्यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी विरोध केल्यानंतर दोन्ही गटांत जुंपली. 

या प्रकरणी सुखबीरसिंग बादल यांनी काँग्रेसचे आमदार रमिंदरसिंग अवला यांचे कुटुंबीय आणि पोलिसांना जबाबदार धरले आहे. ते म्हणाले की, नियोजनबद्धरीतीने अकाली दलाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला करण्यात आला. हिंसाचारात अकाली दलाच्या तीन कार्यकर्त्यांना गोळी लागली आहे. हा गोळीबार आमदाराच्या मुलाने केला आहे. यादरम्यान पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. 

गुरुहरसहाए येथे शिरोमणी अकाली दलाचे नेते वरदेव सिंग मान यांच्या नेतृत्वाखाली अकाली दलाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या विरोधात आंदोलन केले होते. अकाली दलाच्या आरोपानुसार, नगर परिषद निवडणुकीसाठी त्यांचे उमेदवार अर्ज भरण्यासाठी कार्यालयात जात असताना त्यांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी आणि पोलिसांनी अडवले. सरकारी कार्यालयापर्यंत त्यांना जाऊ दिले नाही. त्याचे पर्यवसान आजच्या हाणामारीत झाले. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख