मंत्रिमंडळ विस्तारावर पायलट यांच्याकडून काँग्रेसला टोला; म्हणाले...

राजस्थानमधील नव्या मंत्रिमंडळाचा आज शपथविधी होणार आहे.
मंत्रिमंडळ विस्तारावर पायलट यांच्याकडून काँग्रेसला टोला; म्हणाले...
Ashok Gehlot, Sachin PilotSarkarnama

नवी दिल्ली : राजस्थानमधील मंत्रिमंडळ (Cabinet Reshuffle) विस्ताराचा तिढा सुटला असून सचिन पायलट (Sachin Pilot) समर्थकांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे. आज सायंकाळी चार वाजता शपथविधी होणार आहे. त्याआधी पायलट यांनी पहिल्यांदाच माध्यमांशी बोलताना विस्तारावरून काँग्रेसला टोला लगावला आहे. तसेच आपले मुद्दे मान्य केल्याबद्दल त्यांनी काँग्रेस नेत्यांचे आभारही मानले आहेत.

मुख्यमंत्री अशोक गेहलोत (CM Ashok Gehlot) आणि पायलट यांच्या वादावर अखेर पडदा पडला आहे. माध्यमांशी बोलताना पायलट म्हणाले, चर्चेनंतर पक्ष नेतृत्वाने उचललेल्या पावलांमुळे राज्यभरात सकारात्मक संदेश गेला आहे. आम्ही अनेक मुद्दे वेळोवेळी उपस्थित केले होते. हायकमांड आणि राज्य नेतृत्वाने त्याची दखल घेतल्यामुळे मी आनंदी आहे. मंत्रिमंडळामध्ये आदिवासी समाजाला प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. चार दलित मंत्रीही या मंत्रिमंडळात असतील. आमच्या सरकारमध्ये खूप काळापासून दलित समाजाचे प्रतिनिधित्व नव्हते, असा टोला पायलट यांनी लगावला.

Ashok Gehlot, Sachin Pilot
कृषी कायदे पुन्हा लागू होऊ शकतात; खुद्द राज्यपाल अन् भाजप खासदाराकडूनच संकेत

दलितांना प्रतिनिधित्व देत काँग्रेस, राज्य सरकारने दलित, मागास आणि गरिबांच्या बाजूने पक्ष असल्याचे दाखवून दिले आहे. काँग्रेसने हे अत्यंत महत्वाचे पाऊल टाकणे गरजेचे होते. काँग्रेस पक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भाजपचा खोटारडेपणा जनतेसमोर आणण्यासाठी काम करायला हवे. आता पक्षामध्ये कसलेही वाद नाहीत. सर्वांनी एकत्रित येऊन मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय घेतल्याचे पायलट यांनी स्पष्ट केलं. भविष्यात पक्ष मला जिथे काम करण्यास सांगितले, तिथे न्याय देईन, असंही पायलट यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तारामध्ये 15 नवीन चेहऱ्यांना स्थान दिले जाणार असून, त्यातील 4 राज्यमंत्री असतील. मंत्रिमंडळात सध्या 21 संख्या असून आणखी 9 मंत्र्यांचा समावेश होऊ शकतो. यात पायलट समर्थक ५ आमदारांची वर्णी लागणार आहे. पायलट यांचे समर्थक हेमाराम चौधरी, विश्वेंद्रसिंह आणि रमेश मीणा यांना कॅबिनेट तर ब्रिजेंद्रसिंह ओला आणि मुरारीलाल मीणा यांना राज्यमंत्रिपद मिळणार आहे. विश्वेंद्रसिंह आणि रमेश मीणा यांना मागील वर्षी पायलट यांच्यासोबत मंत्रिमंडळातून डच्चू मिळाला होता. सिंह यांच्याकडे पर्यटन तर मीणा अन्न पुरवठा खाते होते. हेमाराम चौधरी हे सहा वेळा आमदार म्हणून निवडून आले असून, माजी महसूल मंत्रीही होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

याचबरोबर महेंद्रजितसिंह मालवीय, रामलाल जाट, महेश जोशी, ममता भूपेश, टिकाराम जुलाई, भजन लाल जाटव, गोविंदराम मेघवाल आणि शकुंतला रावत या नवीन चेहऱ्यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार आहे. झाहिदा खान आणि राजेंद्रसिंह गुडा यांना राज्यमंत्रिपद मिळणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.