...तर महाराष्ट्रातील नागरिकांना 'नो एंट्री'; कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय

कोरोनाचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात वाढू लागला असून, शेजारील कर्नाटक राज्याने खबरदारीची पावले उचलली आहेत.
rt pcr test certificate mandatory for maharashtra citizens for entry in karnataka
rt pcr test certificate mandatory for maharashtra citizens for entry in karnataka

बंगळूर : महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून कर्नाटक सरकारने आरटी-पीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्याचे प्रमाणपत्र असल्याशिवाय महाराष्ट्रातील नागरिकांना राज्यात प्रवेश न देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. कर्नाटकचे आरोग्यमंत्री  डॉ.के. सुधाकर यांनी याविषयी माहिती दिली. परंतु, या निर्णयाची अद्याप अंमलबजावणी सुरू झालेली नसून, सध्या केवळ थर्मल स्कॅन करुन प्रवेश दिला जात असल्याचे समोर आले आहे. 

डॉ. सुधाकर म्हणाले की, महाराष्ट्र आणि केरळशी कर्नाटकच्या सीमा जोडलेल्या आहेत. महाराष्ट्रात रोज सरासरी 5 ते 6 हजार कोरोना रुग्ण सापडत आहेत. याचवेळी केरळमध्ये रोज सरासरी 4 ते 5 हजार कोरोना रुग्ण सापडत आहेत. यामुळे या दोन्ही राज्यांतील नागरिकांना कर्नाटकमध्ये प्रवेश करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. आरटी-पीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्याचे प्रमाणपत्र असल्याशिवाय महाराष्ट्रासह केरळमधील नागरिकांना कर्नाटकमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. 

दरम्यान, कर्नाटकचे प्रवेशद्वार असणाऱ्या कोगनोळी टोलनाक्‍यावर महाराष्ट्रातून येणाऱ्या सर्व प्रवाशांची तपासणी करूनच कर्नाटकात प्रवेश दिला जात आहे. याबाबतची माहिती निपाणीचे तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी दिली. कोगनोळी टोलनाक्‍यावर तहसीलदार कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत विभागाचे कर्मचारी तैनात केले आहेत. त्यांच्याकडून महाराष्ट्रातून येणाऱ्या वाहनांसह प्रवाशांची तपासणी करण्यात येत आहे. यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने आशा कार्यकर्त्या, आरोग्य अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. 

आज अचानक आरोग्य विभागाने ही तपासणी सुरू केल्याने पुन्हा प्रवेशबंदी होण्याची चर्चा सुरू झाली. पण, केवळ थर्मल स्कॅन करून प्रवाशांना सोडण्यात येत असल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला. कोगनोळी टोलनाक्‍यावर महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणारी चारचाकी वाहने, इतर वाहने आणि त्यातील प्रवाशांची तपासणी करून कर्नाटकात प्रवेश दिला जात आहे. महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या प्रवाशांमध्ये ताप, खोकला, सर्दी अशी लक्षणे असल्यास त्यांना परत पाठवण्यात येणार आहे. 

Edited Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com