संघाच्या शाखा आता मुस्लिम वस्त्यांमध्येही; मोहन भागवतांची मोठी घोषणा - RSS will open shakhas in muslim areas says Mohan Bhagwat | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी

संघाच्या शाखा आता मुस्लिम वस्त्यांमध्येही; मोहन भागवतांची मोठी घोषणा

वृत्तसंस्था
मंगळवार, 13 जुलै 2021

आरएसएसच्या चिंतन शिबीराचा चित्रकुटमध्ये मंगळवारी समारोप झाला. त्यावेळी भागवत यांनी मुस्लिम वस्त्यांमधील शाखांबाबतचे वक्तव्य केलं आहे.

चित्रकूट : राष्ट्रीय स्वयंसेवका संघाचा (RSS)   पुढील काळात मोठा विस्तार केला जाणार असून त्याचेच संकेत सरसंघचालक मोहन भागवत यांनी मंगळवारी दिले. यापुढे मुस्लिम वस्त्यांमध्येही शाखा सुरू करण्याची मोठी घोषणा त्यांनी केली आहे. सर्व भारतीयांचा डीएनए एकच असल्याच्या भागवतांच्या वक्तव्यानंतर ही घोषणा करण्यात आल्याने त्याला महत्व प्राप्त झाले आहे. (RSS will open shakhas in muslim areas says Mohan Bhagwat)

आरएसएसच्या चिंतन शिबीराचा चित्रकुटमध्ये मंगळवारी समारोप झाला. त्यावेळी भागवत यांनी मुस्लिम वस्त्यांमधील शाखांबाबतचे वक्तव्य केलं आहे. चित्रकूटमध्ये 9 जुलैपासून हे शिबीर सुरू होते. संघ ही केवळ हिंदूंची संघटना नसून सर्वसमावेशक असल्याचा संदेश देण्यासाठी मुस्लिम वस्त्यांमध्ये संघाच्या शाखा सुरू करण्याची घोषणा भागवत यांनी यावेळी केली. त्यातून अधिकाधिक मुस्लिमांना संघाशी जोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. 

हेही वाचा : शपथविधीच्या एक तास आधी पंतप्रधान पदाची शपथ घ्यायला दिला होता नकार

मोहन भागवत यांनी काही दिवसांपूर्वीच मोठं विधान केलं होतं. त्यावर काँग्रेससह काही पक्षांच्या नेत्यांनी टीकाही केली होती. सर्व  भारतीयांचा डीएनए  एक आहे. कोणत्याही धर्माचा असला तरी ते वेगळे नाहीत. हिन्दू  मुस्लिम  वेगवेगळे  नाहीत. मॅाब लिंचिंग करणारे लोक हिंदुत्वाच्या विरोधात आहेत, असं भागवत म्हणाले होते. या विधानावर भाजपच्या नेत्या साध्वी प्राची यांनी असहमती दर्शवली होती. यापार्श्वभूमीवर संघाने मुस्लिम वस्त्यांमध्ये शाखा उघडण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. 

दरम्यान, शिबीरामध्ये अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. पश्चिम बंगालबाबतही महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. बंगालची तीन भागात विभागणी करण्यात आली असून त्यानुसार पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या जाणार आहेत. दक्षिण बंगाल, उत्तर बंगाल आणि मध्य बंगाल अशी ही विभागणी असेल. या विभागांची कार्यालये अनुक्रमे कोलकाता, सिलीगुडी आणि वर्धमान येथे असतील. 

संघ सोशल मीडियात होणार सक्रीय

संघाने सोशल मीडियात सक्रीय होण्याचा निर्णयही घेतला आहे. त्याअनुषंगाने स्वतंत्र आयटी सेलची स्थापना केली जाणार आहे. तसेच ई-शाखाही सुरू केल्या जाणार आहे. आयआयटी उत्तीर्णांना या सेलमध्ये संधी दिली जाणार असून त्यामाध्यमातून संघाचा प्रसार वाढवला जाणार आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख