काँग्रेसच्या कार्यकारिणीतीच दोन गटांत जुंपली अन् राहुल गांधी म्हणाले... - row over president election in congress working committee meeting | Politics Marathi News - Sarkarnama

काँग्रेसच्या कार्यकारिणीतीच दोन गटांत जुंपली अन् राहुल गांधी म्हणाले...

वृत्तसंस्था
शुक्रवार, 22 जानेवारी 2021

काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठकीत अध्यक्ष निवडीवरुन आज मोठा गदारोळ झाला. या बैठकीत दोन्ही गट आमनेसामने आले होते. 

नवी दिल्ली : काँग्रेसमधील अध्यक्ष निवडीचा तिढा अद्याप सुटलेला नाही. आज पक्षाच्या कार्यकारिणी बैठकीत दोन गटांमध्ये जोरदार जुंपली.  दोन्ही गट माघार घेण्यास तयार नसल्याचे दिसू लागल्यानंतर अखेर पक्षाचे नेते राहुल गांधी यांना मध्यस्थी करावी लागली. त्यांनी दोन्ही गटांच्या नेत्यांना सुनावून गप्प केले.  

मागील वर्षी लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर सोनिया गांधी यांनी हंगामी अध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे. अध्यक्षपदाच्या निवडीबाबत आज ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीनंतर ज्येष्ठ नेते के.सी. वेणूगोपाल पत्रकारांना माहिती दिली. काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक जून महिन्यात घेण्याचा निर्णय कार्यकारिणीने घेतल्याचे त्यांनी सांगितले.

बैठकीमध्ये दोन गटांमध्ये अध्यक्षपदाच्या निवडीवरुन आमनेसामने आले होते. एका गटाने तातडीने पक्षांतर्गत निवडणूक घेण्याची मागणी केली. त्यामध्ये ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, मुकूल वासनिक आणि पी. चिदंबरम यांचा समावेश होता. या नेत्यांनीच काही निवडणुकांमध्ये पक्षाची हार झाल्यानंतर नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. याचवेळी गांधी परिवाराचे निष्ठावंत असलेले अशोक गेहलोत, अमरिंदरसिंग, तारिक अन्वर आणि ओमेन चंडी यांनी पाच राज्यांतील निवडणुका झाल्यानंतर अध्यक्षपदासाठी निवडणूक घ्यावी, अशी भूमिका घेतली. 

पक्षांतर्गत निवडणुकीमुळे विधानसभा निवडणुकांकडे दुर्लक्ष व्हायला नको, असे एका नेत्याने सांगितले. यावरुन दोन्ही गटांमध्ये जोरदार वाद सुरू झाला. अखेर यामुळे राहुल गांधी यांनी कठोर भूमिका घेतली. ते म्हणाले की, एकदाच काय ते संपवून टाका आणि पुढे वाटचाल करा. 

कार्यकारिणी बैठकीत अध्यक्षपदासाठी जून महिन्यात निवडणूक घेण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. देशातील पाच राज्यांमधील विधासभेच्या निवडणुका संपल्यानंतर काँग्रेसला नवा अध्यक्ष मिळणार असल्याचे आज स्पष्ट झाले. 

निवडणूकीतील अपयशानंतर राहुल गांधी यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. सोनिया गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांनी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी पुन्हा अध्यक्षपद स्वीकारण्यास नकार दिला. शेवटी सोनिया गांधी यांनाच पुन्हा हंगामी अध्यक्ष म्हणून काम सुरू करावे लागले. पक्षाला अद्याप पुर्णवेळ अध्यक्ष  न मिळाल्याने काही नेत्यांकडूनही नाराजी व्यक्त केली जात आहे. सतत बैठका होऊनही कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब होत नाही. त्यामुळे पक्षांतर्गत मरगळ दिसून येत आहे. 

Edited By Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख