प्राप्तिकर विभागाकडे माझ्या जन्मापासून आतापर्यंतची सगळी कागदपत्रे अन् माहिती : रॉबर्ट वद्रा

केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आता रॉबर्ट वद्रा आले आहेत. त्यांची आज सलग दुसऱ्या दिवशी प्राप्तिकर विभागाने कसून चौकशी केली.
Robert Vadra says Income Tax department have everything from inception to now
Robert Vadra says Income Tax department have everything from inception to now

नवी दिल्ली : केंद्रातील भाजप सरकार विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणा लावत असल्याचा आरोप वारंवार होत आहे. असे असताना ब्रिटनमधील मालमत्तेप्रकरणी प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई  रॉबर्ट वद्रा यांची सलग दुसऱ्या दिवशी चौकशी केली. दरम्यान, दुसऱ्या एका प्रकरणात वद्रा यांची सक्तवसुली संचालनालयाकडूनही (ईडी) चौकशी सुरू आहे. 

या चौकशीविषयी बोलताना रॉबर्ट वद्रा म्हणाले की, मी सर्व कागदपत्रे प्राप्तिकर विभागाला दिली आहेत. माझ्या जन्मापासूनची सगळी कागदपत्रे आता त्यांच्याकडे आहेत. त्यांचेही काहीही प्रश्न असले तरी मी त्यांचे उत्तर देण्यास येथेच आहे. 

सध्या करचुकवेगिरीच्या प्रकरणामध्ये वद्रा यांची चौकशी सुरू आहे. काल सहा तास वद्रा यांची चौकशी केल्यानंतर प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांचा जबाब नोंदवून घेतला होता. आज पुन्हा त्यांची चौकशी करण्यात आली. शस्त्रास्त्र दलाल संजय भंडारी याच्या मदतीने वद्रा यांनी ब्रिटनमध्ये मालमत्ता खरेदी केल्याचा संशय आहे. वद्रा यांची २०१८ मधील हवाला व्यवहाराप्रकरणी देखील सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) चौकशी सुरू आहे. 

वद्रा यांच्या दिल्लीतील सुखदेव विहारमधील निवासस्थानी आज दुपारी प्राप्तिकर विभागाचे पथक दाखल झाले. आज सायंकाळपर्यंत त्यांची चौकशी करण्यात आली. याआधी प्राप्तिकर विभागाने वद्रा यांना समन्स बजावले होते मात्र, त्यांनी कोरोनाचे कारण पुढे करत चौकशीला जाणे टाळले होते. 

वद्रा यांच्या ब्रिटनमध्ये दोन मालमत्ता आहेत. लंडनमधील ब्रिस्टन स्क्वेअर येथील त्यांच्या मालमत्तेची किंमत १७.७७ कोटी रुपये आहे. वद्रा यांच्या नावे ब्रिटनमध्ये सात फ्लॅट असल्याचा संशय आहे. या प्रकरणी त्यांची मागील काही दिवसांपासून ईडीकडून चौकशी सुरू आहे. 

सप्टेंबर 2015 मध्ये वद्रा यांच्या स्काय लाईट हॉस्पिटॅलिटी कंपनीच्या विरोधात करचुकवेगिरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. राजस्थानमधील बिकानेर येथील गरीब गावकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी असलेली जमीन त्यांची ताब्यात घेतल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली होती. सप्टेंबर 2018 मध्ये हरियाना सरकारने गुडगावमधील जमीन गैरव्यवहार प्रकरणी वद्रा यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com