रॉबर्ट वद्रांची तब्बल 23 हजार कागदपत्रे जप्त अन् ईडीकडून 13 वेळा चौकशी

केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आता रॉबर्ट वद्रा आले आहेत. त्यांची प्राप्तिकर विभाग आणि ईडीकडून कसून चौकशी सुरू आहे.
robert vadra says have given 23 thousand documents to income tax department
robert vadra says have given 23 thousand documents to income tax department

नवी दिल्ली : राजस्थानमधील बिकानेर येथील मालमत्तेप्रकरणी प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई  रॉबर्ट वद्रा यांची सलग दोन दिवशी चौकशी केली. दरम्यान, दुसऱ्या एका प्रकरणात वद्रा यांची सक्तवसुली संचालनालयाकडूनही (ईडी) चौकशी सुरू आहे. वद्रा यांच्या कार्यालयातून तब्बल 23 हजार कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली असून, ईडीने त्यांची 13 वेळा चौकशी केल्याची माहिती समोर आली आहे.  

सध्या करचुकवेगिरीच्या प्रकरणामध्ये वद्रा यांची चौकशी सुरू आहे. वद्रा यांची सलग दौन दिवस चौकशी केल्यानंतर प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांचा जबाब नोंदवून घेतला होता. राजस्थानमधील बिकानेर येथे वद्रा यांच्याशी निगडित स्काय लाईट हॉस्पिटॅलिटी कंपनीने जमीन खरेदी केली आहे. सप्टेंबर 2015 मध्ये वद्रा यांच्या स्काय लाईट हॉस्पिटॅलिटी कंपनीच्या विरोधात करचुकवेगिरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. बिकानेर येथील गरीब गावकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी असलेली जमीन घेतल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली होती. सप्टेंबर 2018 मध्ये हरियाना सरकारने गुडगावमधील जमीन गैरव्यवहार प्रकरणी वद्रा यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. 

या चौकशीविषयी बोलताना रॉबर्ट वद्रा म्हणाले की, माझ्या कार्यालयातून 23 हजार कागदपत्रे नेण्यात  आली आहेत. माझ्याबद्दल माझ्या कार्यालयात जेवढी माहिती नाही तेवढी आता त्यांच्याकडे आहे. मी प्रत्येक प्रश्नाचे स्पष्टपणे उत्तर दिले आहे. यात कोणतीही करचुकवेगिरी नाही. याचबरोबर ईडीच्या दिल्लीतील कार्यालयात मी चौकशीसाठी 13 वेळा गेलो आहे. ते मला वारंवार तेच प्रश्न विचारत आहेत. आधीच मी त्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. 

वद्रा यांच्या दिल्लीतील सुखदेव विहारमधील निवासस्थानी प्राप्तिकर विभागाचे पथक नुकतेच दाखल झाले होते. त्यांची सलग दोन दिवस चौकशी करण्यात आली होती. याआधी प्राप्तिकर विभागाने वद्रा यांना समन्स बजावले होते मात्र, त्यांनी कोरोनाचे कारण पुढे करत चौकशीला जाणे टाळले होते. 

वद्रा यांची २०१८ मधील हवाला व्यवहारप्रकरणी देखील सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) चौकशी सुरू आहे. शस्त्रास्त्र दलाल संजय भंडारी याच्या मदतीने वद्रा यांनी ब्रिटनमध्ये मालमत्ता खरेदी केल्याचा संशय आहे. वद्रा यांच्या ब्रिटनमध्ये दोन मालमत्ता आहेत. लंडनमधील ब्रिस्टन स्क्वेअर येथील त्यांच्या मालमत्तेची किंमत १७.७७ कोटी रुपये आहे. वद्रा यांच्या नावे ब्रिटनमध्ये सात फ्लॅट असल्याचा संशय आहे. या प्रकरणी त्यांची मागील काही दिवसांपासून ईडीकडून चौकशी सुरू आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com