मी फोन केला अन् लालूंनी थेट तुरुंगातून उचलला... - rjd supremo lalu prasad yadav allegedly using phone from ranchi jail | Politics Marathi News - Sarkarnama

मी फोन केला अन् लालूंनी थेट तुरुंगातून उचलला...

वृत्तसंस्था
बुधवार, 25 नोव्हेंबर 2020

बिहारच्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी संपली असली तरी राजकीय वातावरण अद्याप तापलेलेच आहे. भाजप नेते सुशीलकुमार मोदी यांनी आता लालूप्रसाद यादव यांच्यावर धक्कादायक आरोप केला आहे. 

पाटणा : राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) आमदारांना फोडण्याचा प्रयत्न राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव तुरुंगातून करीत आहेत, असा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी केला आहे. बिहार विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या आमदारांनी विरोधात मतदान करावे, यासाठी लालूंचे प्रयत्न सुरू होते, असे मोदींनी म्हटले आहे. लालूंची ऑडिओ क्लिपही सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यावरुन मोठी खळबळ उडाली आहे. 

सुशीलकुमार मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे, की रांची कारागृहात शिक्षा भोगत असलेले लालूप्रसाद यादव हे एनडीएच्या आमदारांना फोन करून मंत्री बनवण्याचे प्रलोभन देत आहेत. तसेच काही आमदारांना भीतीही दाखवत आहेत. मी स्वत: त्या क्रमांकावर कॉल केला होता. हा कॉल थेट लालूंनीच उचलला होता. एनडीएच्या आमदारांना स्वतःच्या पक्षात ओढून नितीशकुमार यांचे सरकार पाडण्याचा डाव न खेळण्याचा सल्ला मी त्यांना दिला. 

लालू हे आमदारांना सतत फोन करीत होते, तो दूरध्वनी क्रमांकही मोदी यांनी प्रसिद्ध केला आहे. मोदींना ट्विटमध्ये दिलेला क्रमांक हा लालूंचे सहाय्यक इरफान अन्सारी यांचा आहे. लालूंची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यावेळी अन्सारी हे त्यांच्यासमवेत होते. 

याप्रकरणी लालू प्रसाद यादव यांच्यावर कारवाई करण्याची मागणी एनडीएच्या आमदारांनी केली आहे. मोदी यांच्या ट्विटनंतर बिहारमधील राजकारण तापण्यास सुरुवात झाली आहे. लालूंना तुरुंगात मिळणाऱ्या सुविधांबद्दल प्रश्‍न उपस्थित करण्यात येत आहेत. 

लालूंना तुरुंगात अनेक सुविधांबरोबर फोनची सोयही असून त्याचा वापर ते बिनधास्तपणे वापर करीत आहेत, असा आरोप करण्यात येत आहे. यावर कारागृह प्रशासनासह अन्य विभाग दुर्लक्ष करीत असल्याचाही आरोप होत आहे. लालूप्रसाद यांच्या कोठडीत फोन कसा पोचला, याची चौकशी करण्यात येईल, असे तुरुंग अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.  

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख