लालूंची तब्येत पुन्हा बिघडली; तातडीनं एम्समध्ये हलवलं

राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांची प्रकृती पुन्हा बिघडली आहे.
Lalu Prasad Yadav
Lalu Prasad YadavSarkarnama

पाटणा : राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांची प्रकृती पुन्हा बिघडली असून, त्यांना तातडीने दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (AIIMS) हलवण्यात आले आहे. त्यांना ताप आला असून, अशक्तपणा जाणवत आहे. काही दिवसांपूर्वी एम्समध्येच आयसीयूत लालूंवर उपचार सुरू होते.

बिहारमधील पोटनिवडणुकानंतर प्रकृतीच्या कारणास्तव लालू हे पाटण्यातून दिल्लीला गेले होते. परंतु, चारा गैरव्यवहार प्रकरणातील एका खटल्याच्या सुनावणीला हजर राहण्यासाठी ते पाटण्यात परतले होते. केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) विशेष न्यायालयाने त्यांना 23 नोव्हेंबरला हजर राहण्याचा आदेश दिला होता. काल त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने एम्समध्ये हलवण्यात आले आहे.

लालू हे सध्या चारा गैरव्यवहार प्रकरणात शिक्षा भोगत आहे. सध्या ते जामिनावर बाहेर आहेत. रांची कारागृहात असताना प्रकृती ढासळल्याने त्यांना रांचीतील राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये (रीम्स) दाखल करण्यात आले होते. त्यांच्या फुफ्फुसात संसर्ग झाला होता. लालूंची तब्येत 23 जानेवारीला आणखी ढासळल्याने त्यांना 'एम्स'मध्ये हलवण्याच निर्णय त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी घेतला होता. त्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी लालूंना एअर अॅम्बुलन्सने दिल्लीतील 'एम्स'मध्ये हलवण्यात आले होते. लालूंना 'एम्स'मधील 'कार्डिओथोरॅसिक अँड न्यूरोसायन्सेस सेंटर'च्या अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर काही दिवसांनी त्यांना एम्समधून सोडण्यात आले होते.

Lalu Prasad Yadav
मूड महाराष्ट्राचा : सगळे पक्ष स्वतंत्र लढल्यास भाजप सगळ्यात मोठा पक्ष

लालूंवर उपचार करणारे रीम्समधील डॉ. उमेश प्रसाद यांनी त्यांच्या प्रकृतीबद्दल काही महिन्यांपूर्वी लेखी अहवाल दिला होता. या अहवालानुसार, लालूंची किडनी केवळ 25 टक्केच काम करीत आहे. त्यांची प्रकृती कोणत्याही क्षणी ढासळू शकते. किडनीची काम करण्याची क्षमता कधीही कमी होऊ शकते आणि ती नेमकी कधी कमी होईल, हे सांगता येणार नाही. लालूंना मागील 20 वर्षांपासून मधुमेह आहे. हा आजार दिवसेंदिवस बळावत आहे. त्यांचे अवयव अतिशय वेगाने खराब होत आहेत. यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक बनत आहे.

Lalu Prasad Yadav
मूड महाराष्ट्राचा : शिवसेनेचे पारडे पालघरमध्ये जड तर ठाण्यात भाजपसोबत टक्कर

चारा गैरव्यवहार प्रकरणी लालू हे शिक्षा भोगत आहेत. लालूंना 30 ऑगस्ट 2018 रोजी रीम्समध्ये दाखल करण्यात आले होते. चारा गैरव्यवहारप्रकरणी शिक्षा झाल्यानंतर ते बिरसा मुंडा मध्यवर्ती कारागृहात शरण आले होते. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 72 वर्षीय लालू यांना शिक्षा झाल्यापासून डिसेंबर 2017 पासून ते कारागृहात होते. परंतु, शिक्षा झाल्यापासून बहुतांश काळ ते रुग्णालयातच होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com