नितीशजी, तुम्ही आता थकलात..तुम्हाला राज्य सांभाळणं जमेना! - rjd leader tejashwi yadav slams bihar cm nitish kumar over law and order | Politics Marathi News - Sarkarnama

नितीशजी, तुम्ही आता थकलात..तुम्हाला राज्य सांभाळणं जमेना!

वृत्तसंस्था
बुधवार, 13 जानेवारी 2021

बिहारमधील कायदा व सुव्यवस्था ढासळल्याची टीका होत असतानाच इंडिगो कंपनीच्या व्यवस्थापकाची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. 

पाटणा : इंडिगो कंपनीचे विमानतळ व्यवस्थापक रुपेशकुमारसिंह यांच्या हत्येने बिहारमध्ये खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या निवासस्थानापासून थोड्याच अंतरावर झालेल्या या हत्येने राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. दरम्यान, या प्रकरणावरुन राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) नेते तेजस्वी यादव यांनी नितीशकुमारांना लक्ष्य केले आहे. 

पाटणा विमानतळावरून मंगळवारी (ता. १२) कामावरून घरी परतताना सिंह यांची हत्या करण्यात आली होती. हल्लेखोरांनी त्यांच्या अपार्टमेंटसमोरच त्यांच्यावर सात गोळ्या झाडल्या होत्या. मुख्यमंत्री, राज्यपाल आदींचे निवासस्थान तेथून अवघ्या दोन किलोमीटरवर अंतरावर आहे. सिंह यांच्यावर बिहारमधील सारणपूर जिल्ह्यातील जलालपूर या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. सिंह हे अनेक बडे राजकारणी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जवळचे होते. त्यामुळे त्यांच्या हत्येवरुन राज्यात राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा उडाला आहे. 

या हत्येवरुन राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न विरोधी पक्षांसोबत सत्तेत सहभागी असलेल्या भाजपकडूनही उपस्थित केला जात आहे. आरजेडीचे नेते तेजस्वी यादव म्हणाले की, नितीशजी तुम्हा आता थकला आहात. तुम्हाला बिहार सांभाळता येणे शक्य नाही. राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत आहे. तुम्हाला गृह खाते सांभाळणे जमत नसेल तर ते दुसऱ्या कुणाला तरी द्या. नितीशकुमारांना जबरदस्ती मुख्यमंत्री बनवले आहे नाहीतर ते मुख्यमंत्रीच बनले नसते. 

तेजस्वी यादव यांनी मोदींवरही निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, निवडणुकीच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेला म्हणत होते की, तुमचा हा मुलगा दिल्लीत बसला आहे. ते आम्हाला जंगलराजचे युवराज म्हणत होते. आता ते का गप्प बसले आहेत. आता चोर दरवाजाने सरकारमध्ये आलेले लोक नितीशकुमारांबद्दल प्रश्न उपस्थित करीत आहेत. ज्यांचे दोन-दोन उपमुख्यमंत्री आहेत तेच लोक प्रश्न विचारत आहेत. मोदींनी आता सांगावे की रुपेशसिंह यांचया नातेवाईकांनी छठपूजा कशी करावी. 

Edited by Sanjay Jadhav
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख