नवी दिल्ली : राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांची प्रकृती चिंतानजक आहे. त्यांची तब्येत आणखी ढासळू लागल्याने त्यांना एअर अँब्युलन्सने दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) तातडीने हलवण्यात आले आहे. त्यांना अतिदक्षता विभागात (आयसीयू) ठेवण्यात आले आहे. त्यांच्या कुटुंबीयांसह सहकाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली आहे.
लालू हे सध्या कारागृहात शिक्षा भोगत आहेत. मात्र, प्रकृती ढासळल्याने त्यांना रांचीतील राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये (रीम्स) दाखल करण्यात आले होते. त्यांच्या फुफ्फुसात संसर्ग झाला आहे. लालूंची तब्येत काल आणखी ढासळल्याने त्यांना 'एम्स'मध्ये हलवण्याचा निर्णय त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी घेतला होता. त्यानंतर काल सायंकाळी लालूंना 'एम्स'मध्ये हलवण्यात आले.
लालूंना 'एम्स'मधील 'कार्डिओथोरॅसिक अँड न्यूरोसायन्सेस सेंटर'च्या अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. लालूंसोबत त्यांच्या कन्या मिसा भारती या आहेत. लालूंना तेथे दाखल केल्यानंतर त्यांचे कुटुंबीय आणि सहकाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली. लालूंच्या पत्नी आणि सहकारी भोला यादव यांच्या अनेक जण रुग्णालयात दाखल झाले आहेत.
लालूंवर उपचार करणारे रीम्समधील डॉ. उमेश प्रसाद यांनी त्यांच्या प्रकृतीबद्दल नुकताच लेखी अहवाल दिला होता. या अहवालानुसार, लालूंची किडनी केवळ 25 टक्केच काम करीत आहे. त्यांची प्रकृती कोणत्याही क्षणी ढासळू शकते. किडनीची काम करण्याची क्षमता कधीही कमी होऊ शकते आणि ती नेमकी कधी कमी होईल, हे सांगता येणार नाही.
लालूंना मागील 20 वर्षांपासून मधुमेह आहे. हा आजार दिवसेंदिवस बळावत आहे. त्यांचे अवयव अतिशय वेगाने खराब होत आहेत. यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक बनत आहे. रीम्समधील वरिष्ठ अधिकाऱ्यांना लालूंच्या प्रकृतीचा अहवाल सादर करण्यात आला आहे, असे अहवालात म्हटले होते.
चारा गैरव्यवहार प्रकरणी लालू हे शिक्षा भोगत आहेत. लालूंना 30 ऑगस्ट 2018 रोजी रीम्समध्ये दाखल करण्यात आले होते. चारा गैरव्यवहारप्रकरणी शिक्षा झाल्यानंतर ते बिरसा मुंडा मध्यवर्ती कारागृहात शरण आले होते. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
Edited by Sanjay Jadhav
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.