Bihar Election Result 2020 : बिहारमध्ये पहिला विजय आरजेडीचाच..! - rjd candidate lalit yadav is first winning candidate in bihar | Politics Marathi News - Sarkarnama

Bihar Election Result 2020 : बिहारमध्ये पहिला विजय आरजेडीचाच..!

वृत्तसंस्था
मंगळवार, 10 नोव्हेंबर 2020

बिहारच्या विधानसभा निवडणुकीची निकालाची उत्सुकता असून, चालू मतमोजणीत  महाआघाडीपेक्षा राष्ट्रीय लोकशाहीचे आघाडीचे पारडे जड दिसत आहे.  

पाटणा : बिहारच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) नितीशकुमार यांच्या संयुक्त जनता दलाला (जेडीयू) सर्वांत मोठा धक्का बसला आहे. मात्र, भाजप हा राज्यात सध्या सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. एनडीए आघाडीवर असली तरी निवडणुकीतील पहिला अधिकृत विजयी उमेदवार हा राष्ट्रीय जनता दलाचा  (आरजेडी) ठरला आहे. 

बिहार विधानसभेची निवडणूक तीन टप्प्यांत झाली. आज निकाल जाहीर होत आहेत. बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत सत्तारुढ संयुक्त जनता दल (जेडीयू) आणि भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात (एनडीए) राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), काँग्रेस आणि डावे यांची महाआघाडी असे चित्र आहे. 

मतमोजणीत दुपारी एक नंतर एनडीएला एकूण 127 जागांवर आघाडीवर आहे. एनडीच्या जागा सहाने वाढलेल्या दिसत आहेत. याचवेळी महाआघाडी 106  जागांवर आघाडीवर आहे. महाआघाडीच्या जागा चारने कमी झालेल्या आहेत. यात जेडीयूला सर्वाधिक फटका बसला आहे. जेडीयू  48 जागांवर आघाडीवर आहे. मागील विधानसभा निवडणुकीत जेडीयूच्या 72 जागा होत्या. भाजप 74 जागा, राष्ट्रीय जनता दल 66, काँग्रेस 21, लोक जनशक्ती पक्षाला एक जागा असा कल दिसत आहे. 

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मतमोजणीवर परिणाम झाल्याचे पहिलेच उदाहरण बिहारमध्ये घडत आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, या वेळी मतमोजणी केंद्रांची संख्या दुपटीने वाढवण्यात आली आहे. मात्र, मतमोजणी टेबलांची संख्या तेवढीच ठेवण्यात आली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सुरक्षित अंतर राखण्यासाठी ही काळजी घेण्यात आली आहे. मतमोजणी केंद्रांची संख्या 72 हजार 723 वरुन 1 लाख 6 हजार 515 वर नेण्यात आली आहे. मतमोजणीचे 35 फेऱ्यांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. यामुळे दुपारनंतर स्पष्टपणे कल दिसू शकेल. आज दुपारी 12.15 वाजेपर्यंत केवळ 15 टक्केच मतांची मोजणी झाली होती. 

बिहारमध्ये पहिला विजयी उमेदवार निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. दरभंगा ग्रामीण मतदारसंघातील आरजेडीचे उमेदवार ललितकुमार यादव विजयी झाले आहेत. राज्यातील हा पहिला अधिकृत निकाल जाहीर झाला आहे. आरजेडी पिछाडीवर पडला असला तरी पहिला विजयी उमेदवार ठरवण्यात पक्षाने बाजी मारली आहे. 

Edited by Sanjay Jadhav 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख