माझी मीडिया ट्रायल थांबवा; रिया चक्रवर्तीचे सर्वोच्च न्यायालयाला साकडे

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूच्या तपासावरून उठलेला गदारोळ कायम आहे. आता या प्रकरणी रिया चक्रवर्तीने पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
rhea chkraborty approaches supreme court against her media trial
rhea chkraborty approaches supreme court against her media trial

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणी सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागानेही (सीबीआय) गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील आरोपी व सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती हिने आता पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.  

सुशांतच्या मृत्यूप्रकरणी त्याचे पिता के.के.सिंह पाटण्यातील राजीवनगर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला होता. यानंतर तपासावरून महाराष्ट्र आणि बिहार सरकार एकमेकांविरोधात उभे राहिल्याचे चित्र निर्माण झाले होते. दोन राज्यांचे पोलीस या प्रकरणाचा तपास करीत असताना यात ईडीनेही उडी घेतली. सुशांतचा मृत्यू आणि आर्थिक अनियमतितेप्रकरणी ईडीने रिया हिच्यासह सहा जणांवर करचुकवेगिरी प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. सीबीआयने या प्रकरणी रिया चक्रवर्ती, तिचे पिता इंद्रजित, आई संध्या, भाऊ शोविक, सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युएल मिरांडा आणि बिझनेस मॅनेजर श्रुती मोदी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

ईडीने रियाचे चार्टर्ड अकाउंटंट  रितेश शाह आणि संदीप श्रीधर यांची चौकशी केली होती. याचबरोबर सॅम्युएल मिरांडा याची ईडीने तब्बल नऊ तासांहून अधिक काळ चौकशी केली होती. ईडीने या प्रकरणी रिया, शोविक यांच्यासोबत श्रुती यांची चौकशी 7 ऑगस्टला झाली होती. त्यानंतर 8 ऑगस्टला पुन्हा रिया आणि शोविक चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात हजर झाले होते. ईडीला या प्रकरणी इलेक्ट्रॉनिक पुरावे सापडले आहेत. आता ते रिया, तिचे वडील आणि भाऊ यांचे कॉल रेकॉर्ड तपासत आहेत. सुशांतच्या खात्यावरुन काही जणांच्या खात्यावर पैसे वर्ग झाले होते. या प्रकरणीही रियासह तिच्या वडिलांची चौकशी करण्यात येत आहे. 

आता या प्रकरणी रियाने पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणी सुरू असलेली मीडिया ट्रायल थांबवावी, अशी मागणी तिने न्यायालयात केली आहे. सुशांतच्या मृत्यूप्रकरणी प्रसारमाध्यमांमधून तिला जबाबदार धरले जात आहे. याबद्दल रियाने अखेर कायदेशीर पाऊल उचलले आहे. 

सुशांत याने 14 जूनला मुंबईतील घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्याने आत्महत्येचे पाऊल नेमके कशामुळे उचलले याचा तपास मुंबई पोलिस करीत आहेत. त्याच्या आत्महत्येमागे नैराश्याचे अथवा व्यावसायिक शत्रुत्वाचे कारण होते का, याचाही शोध मुंबई पोलीस घेत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत 56 जणांचे जबाब नोंदविले आहेत. यात सुशांतचे कुटुंबीय, त्याचे मित्र, अभिनेत्री रिया चक्रवर्ती, कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांच्यासह इतर काही जणांचा यात समावेश आहे. 

Edited by Sanjay Jadhav
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com