revanth reddy says media is responsible for congress defeat in ghmc polls
revanth reddy says media is responsible for congress defeat in ghmc polls

काँग्रेसचे खासदार म्हणतात, पराभवाची जबाबदारी आमची नव्हे तर तुमची..!

हैदराबाद महापालिका निवडणुकीत जोरदार मुसंडी मारून भाजपने लक्ष वेधले आहे. याचवेळी काँग्रेसच्यादारुण पराभवाचीही जोरदार चर्चा सुरू आहे.

हैदराबाद : हैदराबाद महापालिकेत सत्ताधारी तेलंगण राष्ट्र समितीने (टीआरएस) सर्वाधिक जागा मिळवल्या असून, भाजपनेही मुसंडी मारली आहे. मात्र, काँग्रेसचा दारुण पराभव झाला आहे. या पराभवाचा पहिला फटका तेलंगणचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष एन. उत्तमकुमार रेड्डी यांना बसला आहे. आता तेलंगण काँग्रेसचे कार्याध्यक्ष व खासदार रेवंत रेड्डी यांनी पक्षाच्या पराभवाचे खापर प्रसारमाध्यमांवर फोडले आहे.  

हैदराबाद महापालिकेच्या 150 पैकी 149 जागांसाठी 1 डिसेंबरला मतदान झाले होते. एका जागेवर मतदाराचे चिन्ह चुकीचे असल्याने मतदान रद्द करण्यात आले होते. मतदारांनी आज मतदानासाठी फारसा उत्साह दाखवला नाही. मतदानाची टक्केवारी 46.55 टक्के होती. मागील महापालिका निवडणुकीत 2016 मध्ये मतदानाची आकडेवारी 45.27 टक्के होती. 

महापालिकेचा निकाल काल जाहीर झाला होता. यात टीआरएसने सर्वाधिक 55 जागा मिळवल्या. मात्र, बहुमताच्या आकड्यापासून पक्ष दूरच आहे. भाजप 48 जागा जिंकून दुसऱ्या क्रमांकावर आहे. एआयएमआयएम 44 जागांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. महापालिकेत सत्तास्थापनेसाठी टीआरएसला दुसऱ्या पक्षाची मदत घ्यावी लागणार आहे. 

या निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला आहे. काँग्रेसला केवळ दोनच जागांवर विजय मिळाला आहे. काँग्रेसच्या या पराभवानंतर जोरदार चर्चा सुरू झाली होती. अखेर तेलंगणचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष एन. उत्तमकुमार रेड्डी यांनी राजीनामा दिला आहे. महापालिका निवडणुकीतील पराभवानंतर नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा दिल्याचे समजते. 

तेलंगण काँग्रेसचे कार्याध्यक्ष व खासदार रेवंत रेड्डी यांनी मात्र, पराभवाची जबाबदारी झटकून माध्यमांवर ढकलली आहे. त्यांनी म्हटले आहे की, प्रत्येक वृत्तवाहिनीने एकाचा राजकीय पक्षाला पाठिंबा दिला. काँग्रेसच्या प्रचाराला मात्र, अतिशय कमी स्थान देण्यात आले. महापालिकेत काँग्रेसचा पराभव होण्यामागील मुख्य कारण माध्यमेच आहेत. भाजप आणि टीआरएसने वृत्तवाहिन्यांनी पॅकेज दिली मात्र, काँग्रेसकडे एवढा पैसा नाही. 

भाजपने महापालिका निवडणुकीत राष्ट्रीय पातळीवरील नेते, केंद्रीय मंत्री, इतर राज्यांचे मुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्र्यांना उतरवले. याचवेळी काँग्रेसने राष्ट्रीय नेतृत्व नव्हे तर कार्यकर्त्यांच्या बळावर निवडणूक लढवली. टीआरएसने तर सगळ्या मंत्र्यांना प्रचारात उतरवले होते. याचवेळी काँग्रेस सोडून इतर पक्ष निवडणुकीला धार्मिक रंग देत होता, असे रेड्डी यांनी स्पष्ट केले. 

भाजपने नुकतीच डुब्बक विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीची एक जागा जिंकली होती. भाजपचे उमेदवार रघुनंदन राव यांनी तेलंगण राष्ट्र समितीच्या (टीआरएस) सोलिपेटा सुजाता यांचा 1 हजार 470 मतांनी पराभव केला होता. यामुळे भाजपचा आत्मविश्वास वाढला होता आणि महापालिकेत सत्ता मिळवण्यासाठी भाजपने कंबर कसली होती.  

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सुद्धा प्रचारात उतरले होते. त्यांनी वादग्रस्त भाग्यलक्ष्मी मंदिरापासून प्रचाराचा सुरवात केली होती. हे मंदिर हैदराबादमधील प्रसिद्ध चारमिनारच्या पायथ्याशी आहे. भारतीय पुरातत्व विभागाने या मंदिराचे बांधकाम अवैध ठरवले होते. तसेच, उच्च न्यायालयानेही या मंदिराचा विस्तार करण्यास मनाई घातली होती. याचबरोबर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही प्रचार केला होता. 

हैदराबाद महापालिकेसाठी टीआरएसने सगळ्या 150 जागांवर उमेदवार उभे केले आहेत. याचवेळी भाजप 149, काँग्रेस 146, तेलगू देसम पक्ष (टीडीपी) 106, एआयएमआयएम 51, डावे पक्ष 29 जागांवर निवडणूक लढत आहेत. मागील 2016 च्या निवडणुकीत टीआरएसने 99 जागांवर विजय मिळवून सत्ता स्थापन केली होती. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com