तालिबानला मोठा धक्का! 300 दहशतवाद्यांचा अफगाणी सैन्याकडून खातमा

राजधानी काबूलसह संपूर्ण अफगाणिस्तानवर तालिबान्यांनी कब्जा केला आहे. परंतु, त्यांना पंजशीर प्रांत काबीज करता आलेला नाही.
तालिबानला मोठा धक्का! 300 दहशतवाद्यांचा अफगाणी सैन्याकडून खातमा
resistance forces killed 300 talibani terrorists in andarab

काबूल : राजधानी काबूलसह (Kabul) संपूर्ण अफगाणिस्तानवर (Afghanistan) तालिबान्यांनी (Taliban) कब्जा केला आहे. परंतु, त्यांना पंजशीर (Panjshir) प्रांत काबीज करता आलेला नाही. तो ताब्यात घेण्यासाठी हजारो तालिबानी चालून गेले होते. परंतु, तालिबानविरोधी अफगाणी सैन्य, बंडखोर यांच्या दलांनी प्रत्युत्तर देऊन त्यांना अंदराबमध्ये रोखले. यात 300 तालिबानी दहशतवाद्यांचा खातमा करण्यात आला आहे. 

पंजशीर हा प्रांत काबूलपासून 125 किलोमीटर अंतरावर आहे. हा प्रांत अजूनही तालिबानपासून सुरक्षित राहिलेला आहे. मागील अनेक वर्षांपासून या प्रांतातून तालिबानला विरोध होत राहिला आहे. सोव्हियत महासंघाशी लढणारा दहशतवादी नेता अहमद शाह मसूद याचे या प्रांतावर पूर्वी वर्चस्व होते. तालिबानने 20 वर्षांपूर्वी अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवले तेव्हाही पंजशीर प्रांतात ते घुसू शकले नव्हते. पंजशीरमध्ये आता जोरदार धुमश्चक्री सुरू आहे. अंदराब येथे तालिबानविरोधी दलांनी दिलेल्या प्रत्युत्तरात 300 तालिबानी दहशतवाद्यांचा खातमा झाला आहे. 

अफगाणिस्तानचे माजी उपाध्यक्ष अमरुल्ला सालेह यांनी स्वत:ला देशाचा हंगामी अध्यक्ष जाहीर केले आहे. त्यांनी आज सकाळी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, तालिबानी मोठ्या संख्येने पंजशीर प्रांताच्या प्रवेशद्वारावर जमा झाले आहेत. तालिबानविरोधी दले त्यांना उत्तर देत आहेत. तालिबानने शेजारील अंदराब खोऱ्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. परंतु, ते सापळ्यात अडकले आणि त्यांना तेथून जिवंत बाहेर पडता आले नाही. मोठ्या संख्येने तालिबानी पंजशीरच्या प्रवेशद्वारावर जमा झाले आहेत. तालिबानविरोधी दलांनी सलांग महामार्ग बंद केलेला आहेत. तालिबानने या भूभागात प्रवेश करणे टाळायला हवे होते.  

अमरुल्ला सालेह आणि अहमद शाह मसूदचा मुलगा अहमद मसूद यांनी तालिबानी सैन्य आणि इतर बंडखोर दलांना एकत्र घेऊन तालिबानविरोधात लढा सुरू केला आहे. या प्रांताने आधी सोव्हिएत महासंघ आणि नंतर तालिबान यांना शिरकाव करण्याची संधी दिली नव्हती. असे असले तरी सध्याची स्थिती वेगळी आहे. 20 वर्षांत तालिबानची ताकद वाढली आहे. तसेच तालिबान्यांनी या प्रांताला घेराव घालण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे पंजशीरमधील सैन्य तालिबान्यांशी किती काळ झूंज देत राहणार, याबाबत साशंकता व्यक्त केली जाऊ लागली आहे. अजूनही तालिबान्यांपासून सुरक्षित असलेल्या या प्रांताकडून आता आंतरराष्ट्रीय मदतीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

अमरूल्ला सालेह हेही सध्या पंजशीर प्रांतातच आहेत. ते इतर सहकाऱ्यांसह तालिबानच्या विरोधात आघाडी उघडण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पण तालिबानच्या ताकदीसमोर पंजशीर फार काळ टिकाव धरू शकणार नाही, अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पंजशीरमधील एका गटाकडून तालिबानशी हातमिळवणी करण्याची शक्यता आहे. तालिबानकडून जोरदार प्रतिहल्ला झाल्यास मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होऊ शकते, या भीतीने सालेह यांनाही पंजशीर सोडण्यास सांगितलं जाऊ शकतं. पंतशीर प्रांत तालिबानच्या ताब्यात देऊन काही नेत्यांकडून राजकीय हित साधण्याचा प्रयत्न केला जात असल्याची चर्चाही या भागात आहे. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in