अट्टल गुन्हेगार अन् अंडरवर्ल्डमधील गुन्हेगारांसोबत अर्णब गोस्वामींना ठेवलंय.. - republic tv pardip bhandari writes letter to cji regarding arnab goswami arrest | Politics Marathi News - Sarkarnama

अट्टल गुन्हेगार अन् अंडरवर्ल्डमधील गुन्हेगारांसोबत अर्णब गोस्वामींना ठेवलंय..

वृत्तसंस्था
सोमवार, 9 नोव्हेंबर 2020

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेवरुन गदारोळ सुरू आहे. गोस्वामी यांच्या सुटकेसाठी थेट सरन्यायाधीशांनाच साकडे घालण्यात आले आहे. 

मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेच्या मुद्द्यावरुन मोठा गदारोळ सुरू आहे. गोस्वामी यांची 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे. गोस्वामी हे सध्या तळोजा तुरुंगात आहेत. गोस्वामी यांच्यावरील कारवाईवरुन रिपब्लिक टीव्हीने थेट सरन्यायाधीशांनाच साकडे घातले आहे.   

गोस्वामी यांना वरळीतील निवासस्थानातून 4 नोव्हेंबरला अटक करुन अलिबाग जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने गोस्वामी यांची रवानगी 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत केली होती. न्यायालयीन कोठडीमुळे गोस्वामी यांना तुरुंगात हलवण्यात आले. सध्या ते तळोजा तुरुंगात ठेवण्यात आले आहे. 

रिपब्लिक टीव्हीचे प्रदीप भंडारी यांनी सरन्यायाधीशांना पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, कोणत्याही कारणाशिवाय अर्णब गोस्वामी यांना मुंबईतून तळोजा तुरुंगात हलवण्यात आले आहे. या तुरुंगात सगळे अट्टल गुन्हेगार आणि अंडरवर्ल्डमधील गुन्हेगार आहेत. गोस्वामी यांना त्यांच्या वकिलाशीही बोलू दिले जात नाही. तरीही ते काही शब्द आमच्या प्रतिनिधीशी बोलू शकले आहेत. त्यांना मारहाण झाली असून, त्यांचा जीव धोक्यात आहे. 

यामुळे राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने याची तातडीने दखल घेऊन तातडीने आजच्या आज पथक तळोजा कारागृहात पाठवावे. या प्रकरणी स्वतंत्र चौकशी सुरू करून गोस्वामी यांच्या तुरुंगातील सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे पत्रात म्हटले आहे. 

देशातील आघाडीच्या पत्रकाराच्या मानवी हक्कांवर गदा आणण्यात आली असून, तातडीने या प्रकरणी कारवाई करावी, अशी प्रार्थना करीत आहे. महाराष्ट्र सरकारकडून राजकीय कारणांसाठी पत्रकाराला शांत केले जात आहे, असेही पत्रात नमूद केले आहे.

गोस्वामी यांनी अटकेला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. उच्च न्यायालयात त्यावर 7 नोव्हेंबरला सुनावणी झाली होती. गोस्वामी यांनी अटकेला आव्हान देऊन या प्रकरणातून तात्पुरता दिलासा देण्याची मागणी केली होती. उच्च न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल राखून ठेवून, गोस्वामी यांना तातडीने कोणताही दिलासा देण्यास नकार दिला होती. याचबरोबर कनिष्ठ न्यायालयात जामिनासाठी अर्ज करण्यास 4 दिवसांची मुदत दिली होती. 

उच्च न्यायालयाने आज गोस्वामी यांच्या जामीन अर्जावर निर्णय दिला. उच्च न्यायालयाने गोस्वामी यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. यामुळे गोस्वामी यांनी अलिबाग न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. यावर अलिबाग न्यायालयाला चार दिवसांत निर्णय देण्याचेही उच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत. 

इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक व त्यांची आई कुमुद नाईक यांच्या २०१८ मध्ये झालेल्या मृत्युप्रकरणी रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना बुधवारी (ता.4) महाराष्ट्र पोलिसांनी अटक केली होती. इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक व त्यांच्या मातोश्री कुमुद नाईक हे दोघे २०१८ मध्ये अलिबाग येथे मृतावस्थेत सापडले होते. या दोघांनीही आत्महत्या केली होती. 

पोलिसांना त्यावेळी अन्वय यांनी लिहिलेली चिठ्ठी सापडली होती. अर्णब गोस्वामी व अन्य दोघांनी आपणास व्यवहाराचे ५ कोटी ४० लाख रुपये न दिल्याने आपण आर्थिक अडचणीत आलो असून, त्यामुळे आत्महत्या करावी लागत असल्याचे या चिठ्ठीत म्हटले होते. त्यावेळी पोलिसांनी अर्णब यांच्या विरोधात अन्वय व त्यांच्या आईला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला होता. ही फाईल नंतर बंद करण्यात आली. या वर्षीच्या मे महिन्यात अन्वय यांची कन्या अज्ञा नाईक हिने हा तपास नीट झाला नसल्याची तक्रार केल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणी सीआयडी चौकशीचा आदेश दिला होता. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख