अर्णब गोस्वामींनी कारागृहात असे घालवले दिवस...सातशे कैद्यांत एकच टीव्ही अन्... - republic tv editor arnab goswami tells his days of taloja jail | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पूरग्रस्तांना तातडीची मदत; घरात पाणी शिरलेल्यांना १० हजार, अन्न धान्याचे नुकसान झालेल्यांना ५ हजार रुपय मिळणार. वडेट्टीवार यांची घोषणा
सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदार व खासदारांचे एक महिन्याचे वेतन पुरग्रस्तांना देण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगलीत दिली.

अर्णब गोस्वामींनी कारागृहात असे घालवले दिवस...सातशे कैद्यांत एकच टीव्ही अन्...

वृत्तसंस्था
मंगळवार, 17 नोव्हेंबर 2020

अर्णब गोस्वामी यांच्या अटकेवरुन मोठा गदारोळ उडाला होता. त्यांची आठवडाभरानंतर कारागृहातून सुटका झाली होती. त्यांनी आता कारागृहातील अनुभव मांडले आहेत. 

मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेच्या मुद्द्यावरुन मोठा गदारोळ सुरू होता. अखेर सर्वोच्च न्यायालयाने गोस्वामी यांना अंतरीम जामीन मंजूर केला होता. गोस्वामी यांनी आता कारागृहातील अनुभव कथन केले आहेत. गँगस्टर आणि दहशतवादी ठेवलेल्या तळोजा कारागृहातील दिवस कसे घालवले याचा उलगडा गोस्वामी यांनी केला आहे. 

गोस्वामी यांना ४ नोव्हेंबरला अटक झाली होती. न्यायालयाने गोस्वामी यांची रवानगी १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत केली होती. न्यायालयीन कोठडीमुळे गोस्वामी यांना तळोजा कारागृहात ठेवण्यात आले होते. गोस्वामी यांनी अटकेला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाने ९ नोव्हेंबरला गोस्वामी यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. 

याप्रकरणी गोस्वामी यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. अखेर सर्वोच्च न्यायालयाने गोस्वामी यांना अंतरीम जामीन मंजूर केला होता. गोस्वामी यांची ११ नोव्हेंबरला रात्री तळोजा कारागृहातून सुटका करण्यात आली होती. सात दिवसांच्या न्यायालयीन कोठडीनंतर गोस्वामी यांची सुटका झाली होती. 

गोस्वामी यांनी रिपब्लिक टीव्हीवरील कार्यक्रमात तळोजा कारागृहातील अनुभव कथन केले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, तळोजा कारागृहात गँगस्टर अबू सालेम आणि दहशतवादी अबू जिंदाल यांच्यासारखे गुन्हेगार ठेवले आहेत. वेगवेगळ्या कारागृहात ठेवून माझे मनौधैर्य करण्याचा मुंबई पोलिसांचा प्रयत्न होता. परंतु, मी संघर्षातून बाहेर आलेलो आहे आणि इतक्या सहजपणे गुडघे टेकणार नाही. 

मी ज्या कोठडीत होतो तेथून २० मीटर अंतरावर एकच टीव्ही होता. तब्बल सातशे कैद्यांमध्ये एकच टीव्ही होता. टीव्ही लांब असल्याने तो स्पष्टपणे पाहताही येत नव्हता. मात्र, टीव्हीचा आवाज ऐकू येत होता. लोकांनी मात्र, मला भरभरून प्रेम दिले. काही लोक रोज माझ्यासाठी जेवण घेऊन येत होते. रोज सकाळी, दुपारी, संध्याकाळी लोक जेवण घेऊन कारागृहात येत होते, असे गोस्वामी यांनी म्हटले आहे. 

इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक व त्यांची आई कुमुद नाईक यांच्या २०१८ मध्ये झालेल्या मृत्युप्रकरणी रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना 4 नोव्हेंबरला महाराष्ट्र पोलिसांनी अटक केली होती. इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक व त्यांच्या मातोश्री कुमुद नाईक हे दोघे २०१८ मध्ये अलिबाग येथे मृतावस्थेत सापडले होते. या दोघांनीही आत्महत्या केली होती. 

पोलिसांना त्यावेळी अन्वय यांनी लिहिलेली चिठ्ठी सापडली होती. अर्णब गोस्वामी व अन्य दोघांनी आपणास व्यवहाराचे ५ कोटी ४० लाख रुपये न दिल्याने आपण आर्थिक अडचणीत आलो असून, त्यामुळे आत्महत्या करावी लागत असल्याचे या चिठ्ठीत म्हटले होते. त्यावेळी पोलिसांनी अर्णब यांच्या विरोधात अन्वय व त्यांच्या आईला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला होता. ही फाईल नंतर बंद करण्यात आली. आता पुन्हा या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख