अन् अर्णब गोस्वामी म्हणाले, उद्धवजी... - republic tv editor arnab goswami targets cm uddhav thackeray | Politics Marathi News - Sarkarnama

अन् अर्णब गोस्वामी म्हणाले, उद्धवजी...

वृत्तसंस्था
रविवार, 15 नोव्हेंबर 2020

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेवरुन गदारोळ सुरू आहे. गोस्वामी यांनी सुटकेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करणे सुरूच ठेवले आहे. 

मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेच्या मुद्द्यावरुन मोठा गदारोळ सुरू होता. गोस्वामी हे तळोजा कारागृहात होते. अखेर सर्वोच्च न्यायालयाने गोस्वामी यांना अंतरीम जामीन मंजूर केला होता. त्यामुळे गोस्वामी यांची सात दिवसांनंतर कारागृहातून सुटका झाली होती. सुटकेनंतरही गोस्वामी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करणे सुरुच ठेवले आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे. 

गोस्वामी यांना ४ नोव्हेंबरला अटक झाली होती. न्यायालयाने गोस्वामी यांची रवानगी १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत केली होती. न्यायालयीन कोठडीमुळे गोस्वामी यांना तळोजा कारागृहात ठेवण्यात आले होते. गोस्वामी यांनी अटकेला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाने ९ नोव्हेंबरला गोस्वामी यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. 

याप्रकरणी गोस्वामी यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. यावर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश डी.वाय.चंद्रचूड आणि इंदिरा बॅनर्जी यांच्या खंडपीठासमोर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी झाली होती. अखेर सर्वोच्च न्यायालयाने गोस्वामी यांना अंतरीम जामीन मंजूर केला होता. न्यायालयाच्या आदेशाचे पालन करीत गोस्वामी यांची तातडीने सुटका होईल हे पाहण्याचे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने पोलीस आयुक्तांना दिले होते. 

गोस्वामी यांची ११ नोव्हेंबरला रात्री तळोजा कारागृहातून सुटका करण्यात आली होती. सात दिवसांच्या न्यायालयीन कोठडीनंतर गोस्वामी यांची सुटका झाली होती. आता सुटकेनंतर गोस्वामी यांनी उद्धव ठाकरेंवरील हल्लाबोल कायम ठेवला आहे. 

माझ्या विरोधात लढण्यासाठी तुम्ही कोट्यवधी रुपये खर्च केले पण तुम्ही १३० कोटी जनतेसमोर हरलात, असा टोला गोस्वामी यांनी लगावला आहे. त्यांनी म्हटले आहे की, माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांना वाटले होते की ते माझ्या इराद्यांवर बुलडोजर फिरवू शकतात. मी त्यांना सांगू इच्छितो की मी आता आणखी मजबूत झालो आहे. आता या लढाईत हरलेल्या लोकांनी राजीनामा द्यायला हवा. 

तुमचा सध्या एकच अजेंडा आहे तो म्हणजे रिपब्लिक टीव्ही. तुम्ही केवळ माझ्याबद्दलच बोलत असता. हा गुन्हा दाखल करा, तो गुन्हा दाखल करा. तुम्हाला खूप राग आला आहे, असे लोक म्हणतात. मी स्पष्टपणे सांगतो की मुख्यमंत्री म्हणून तुम्ही सपशेल अपयशी ठरला आहात. तुमच्या आजूबाजूच्या पाच लोकांशिवाय सगळ्या जनतेला हेच वाटते, अशी टीका गोस्वामी यांनी केली आहे. 

इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक व त्यांची आई कुमुद नाईक यांच्या २०१८ मध्ये झालेल्या मृत्युप्रकरणी रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना बुधवारी (ता.4) महाराष्ट्र पोलिसांनी अटक केली होती. इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक व त्यांच्या मातोश्री कुमुद नाईक हे दोघे २०१८ मध्ये अलिबाग येथे मृतावस्थेत सापडले होते. या दोघांनीही आत्महत्या केली होती. 

पोलिसांना त्यावेळी अन्वय यांनी लिहिलेली चिठ्ठी सापडली होती. अर्णब गोस्वामी व अन्य दोघांनी आपणास व्यवहाराचे ५ कोटी ४० लाख रुपये न दिल्याने आपण आर्थिक अडचणीत आलो असून, त्यामुळे आत्महत्या करावी लागत असल्याचे या चिठ्ठीत म्हटले होते. त्यावेळी पोलिसांनी अर्णब यांच्या विरोधात अन्वय व त्यांच्या आईला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला होता. ही फाईल नंतर बंद करण्यात आली. आता पुन्हा या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख