उच्च न्यायालयानं कनिष्ठ न्यायालयात जाण्यास सांगितलं अन् गोस्वामी गेले सर्वोच्च न्यायालयात - Republic TV editor Arnab Goswami moves Supreme Court for bail | Politics Marathi News - Sarkarnama

उच्च न्यायालयानं कनिष्ठ न्यायालयात जाण्यास सांगितलं अन् गोस्वामी गेले सर्वोच्च न्यायालयात

वृत्तसंस्था
मंगळवार, 10 नोव्हेंबर 2020

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेवरुन गदारोळ सुरू आहे. उच्च न्यायालयाने दिलासा देण्यास नकार दिल्याने गोस्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. 

मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेच्या मुद्द्यावरुन मोठा गदारोळ सुरू आहे. गोस्वामी यांची 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे. गोस्वामी हे सध्या तळोजा तुरुंगात आहेत. गोस्वामी यांचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला होता. त्यांना कनिष्ठ न्यायालयात जाण्यास उच्च न्यायालयाने सांगितले होते. गोस्वामी यांनी मात्र, आता थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.  

गोस्वामी यांना वरळीतील निवासस्थानातून 4 नोव्हेंबरला अटक करुन अलिबाग जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने गोस्वामी यांची रवानगी 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत केली होती. न्यायालयीन कोठडीमुळे गोस्वामी यांना तुरुंगात हलवण्यात आले. सध्या त्यांना तळोजा तुरुंगात ठेवण्यात आले आहे. 

गोस्वामी यांनी अटकेला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. उच्च न्यायालयात त्यावर 7 नोव्हेंबरला सुनावणी झाली होती. गोस्वामी यांनी अटकेला आव्हान देऊन या प्रकरणातून तात्पुरता दिलासा देण्याची मागणी केली होती. उच्च न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल राखून ठेवून, गोस्वामी यांना तातडीने कोणताही दिलासा देण्यास नकार दिला होती. याचबरोबर कनिष्ठ न्यायालयात जामिनासाठी अर्ज करण्यास 4 दिवसांची मुदत दिली होती. 

उच्च न्यायालयाने 9 नोव्हेंबरला गोस्वामी यांच्या जामीन अर्जावर निर्णय दिला. उच्च न्यायालयाने गोस्वामी यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. दरम्यान, गोस्वामी यांनी अलिबाग सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. यावर अलिबाग न्यायालयाला चार दिवसांत निर्णय देण्याचेही उच्च न्यायालयाने निर्देश दिले होते. आता याप्रकरणी गोस्वामी यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दरम्यान, गोस्वामी अलिबाग सत्र न्यायालयात केलेल्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. 

इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक व त्यांची आई कुमुद नाईक यांच्या २०१८ मध्ये झालेल्या मृत्युप्रकरणी रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना बुधवारी (ता.4) महाराष्ट्र पोलिसांनी अटक केली होती. इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक व त्यांच्या मातोश्री कुमुद नाईक हे दोघे २०१८ मध्ये अलिबाग येथे मृतावस्थेत सापडले होते. या दोघांनीही आत्महत्या केली होती. 

पोलिसांना त्यावेळी अन्वय यांनी लिहिलेली चिठ्ठी सापडली होती. अर्णब गोस्वामी व अन्य दोघांनी आपणास व्यवहाराचे ५ कोटी ४० लाख रुपये न दिल्याने आपण आर्थिक अडचणीत आलो असून, त्यामुळे आत्महत्या करावी लागत असल्याचे या चिठ्ठीत म्हटले होते. त्यावेळी पोलिसांनी अर्णब यांच्या विरोधात अन्वय व त्यांच्या आईला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला होता. ही फाईल नंतर बंद करण्यात आली. या वर्षीच्या मे महिन्यात अन्वय यांची कन्या अज्ञा नाईक हिने हा तपास नीट झाला नसल्याची तक्रार केल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणी सीआयडी चौकशीचा आदेश दिला होता. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख