गोस्वामींच्या अडचणीत आणखी वाढ...रिपब्लिक टीव्हीचा सीएफओ चौकशीच्या फेऱ्यात

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेवरुन गदारोळ सुरू आहे. गोस्वामी यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
गोस्वामींच्या अडचणीत आणखी वाढ...रिपब्लिक टीव्हीचा सीएफओ चौकशीच्या फेऱ्यात
republic tv cfo s sundaram questioned by raigad police

मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेच्या मुद्द्यावरुन मोठा गदारोळ सुरू होता. अखेर सर्वोच्च न्यायालयाने गोस्वामी यांना अंतरीम जामीन मंजूर केला होता. आता रायगड पोलिसांच्या गुन्हे शाखेने रिपब्लिक टीव्हीचे मुख्य वित्तीय अधिकारी (सीएफओ) एस. सुंदरम यांची चौकशी केली आहे. यामुळे गोस्वामी यांच्या अडचणीत आणखी वाढ झाल्याचे मानले जात आहे. 

गोस्वामी यांना ४ नोव्हेंबरला अटक झाली होती. न्यायालयाने गोस्वामी यांची रवानगी १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत केली होती. न्यायालयीन कोठडीमुळे गोस्वामी यांना तळोजा कारागृहात ठेवण्यात आले होते. गोस्वामी यांनी अटकेला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाने ९ नोव्हेंबरला गोस्वामी यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. 

याप्रकरणी गोस्वामी यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. अखेर सर्वोच्च न्यायालयाने गोस्वामी यांना अंतरीम जामीन मंजूर केला होता. न्यायालयाच्या आदेशाचे पालन करीत गोस्वामी यांची तातडीने सुटका होईल हे पाहण्याचे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने पोलीस आयुक्तांना दिले होते. गोस्वामी यांची ११ नोव्हेंबरला रात्री तळोजा कारागृहातून सुटका करण्यात आली होती. सात दिवसांच्या न्यायालयीन कोठडीनंतर गोस्वामी यांची सुटका झाली होती. 

रायगड पोलिसांच्या गुन्हे शाखेने नुकतीच रिपब्लिक टीव्हीचे सीएफओ एस. सुंदरम यांची चौकशी केली. गोस्वामी यांच्या आर्थिक व्यवहारांबाबत पोलिसांनी सुंदरम यांच्याकडे चौकशी केली. गोस्वामी यांच्या आर्थिक व्यवहारांचीही तपासणी पोलीस करीत आहेत. सुंदरम यांच्या चौकशीमुळे गोस्वामी यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. या प्रकरणी न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्याआधी गोस्वामींच्या इतर आर्थिक व्यवहारांची तपासणी करण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक व त्यांची आई कुमुद नाईक यांच्या २०१८ मध्ये झालेल्या मृत्युप्रकरणी रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना बुधवारी (ता.4) महाराष्ट्र पोलिसांनी अटक केली होती. इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक व त्यांच्या मातोश्री कुमुद नाईक हे दोघे २०१८ मध्ये अलिबाग येथे मृतावस्थेत सापडले होते. या दोघांनीही आत्महत्या केली होती. 

पोलिसांना त्यावेळी अन्वय यांनी लिहिलेली चिठ्ठी सापडली होती. अर्णब गोस्वामी व अन्य दोघांनी आपणास व्यवहाराचे ५ कोटी ४० लाख रुपये न दिल्याने आपण आर्थिक अडचणीत आलो असून, त्यामुळे आत्महत्या करावी लागत असल्याचे या चिठ्ठीत म्हटले होते. त्यावेळी पोलिसांनी अर्णब यांच्या विरोधात अन्वय व त्यांच्या आईला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला होता. ही फाईल नंतर बंद करण्यात आली. आता पुन्हा या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in