रिपब्लिक टीव्हीचा सीएफओ न आल्याने सीईओ चौकशीत अडकला

बनावट टीआरपी प्रकरणी काही चॅनेल्स संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे. या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याची निर्णय मुंबई पोलिसांनी घेतला आहे.
republic tv ceo questioned by mumbai police in trp scam case
republic tv ceo questioned by mumbai police in trp scam case

मुंबई : बनावट टीआरपी प्रकरणी गुन्हे शाखेने रिपब्लिक टीव्हीचे मुख्य वित्तीय अधिकारी (सीएफओ) शिवा सुब्रह्मण्यम सुंदरम यांना चौकशीसाठी समन्स बजावले होते. परंतु, सुंदरम यांनी चौकशीला हजर राहण्यास नकार दिला होता. यामुळे आज रिपब्लिक टीव्हीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास खानचंदानी यांची गुन्हे शाखेने चौकशी सुरू केली.  

मुंबई पोलिसांनी नुकतेच बनावट टीआरपी मिळवण्याबाबतचे रॅकेट उद्‌ध्वस्त केले. त्यात रिपब्लिक भारत, फक्त मराठी आणि बॉक्‍स सिनेमा या तीन चॅनेल्सचा समावेश होता. त्यांनी बनावट पद्धतीने टीआरपी मिळवल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी टीआरपी पद्धतीवरच प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.  

याप्रकरणी गुन्हे शाखेने रिपब्लिक टीव्हीचे सीएफओ सुंदरम यांना काल गुन्हे शाखेच्या कार्यालयात उपस्थित राहण्यासाठी समन्स पाठवले होते. याशिवाय रिपब्लिकसाठी काम करणाऱ्या दोन जाहिरात कंपन्यांनाही गुन्हे शाखेने समन्स बजावले होते. तसेच, बॉक्‍स सिनेमा व फक्त मराठी या वाहिन्यांच्या अधिकाऱ्यांनाही गुन्हे शाखेने समन्स बजावले होते. 

सुंदरम यांनी काल चौकशीसाठी गुन्हे शाखेसमोर हजर राहण्यास नकार दिला आहे. त्यांनी यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेसह इतर काही कारणे दिली होती. त्यांनी म्हटले आहे की, मुंबई पोलीस या प्रकरणात माझ्या विरोधात पुढील कारवाई करु शकत नाहीत.  माझ्या काही पूर्वनियोजित बैठका मुंबईबाहेर आहेत. त्यामुळे मी 14 -15 ऑक्टोबरला चौकशीसाठी हजर राहू शकेन. 

यामुळे गुन्हे शाखेने काल रिपब्लिक टीव्हीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास खानचंदानी, मुख्य कार्यपालन अधिकारी (सीओओ) हर्ष भंडारी व प्रिया मुखर्जी, चॅनेलचे वितरणप्रमुख धनश्यामसिंह, 'हंसा'चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण निझरा आणि इतर कर्मचाऱ्यांना आज चौकशीसाठी समन्स बजावले होते. खानचंदानी आज सकाळी मुंबई पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर झाले. पोलीस त्यांची कसून चौकशी करीत आहेत.  

टीव्ही वाहिन्यांचा टीआरपी 'बीएआरसी' नावाची संस्था ठरवत असते. 'बीएआरसी'ने हे कंत्राट हंसा या संस्थेला दिले होते. मात्र, हंसा कंपनीतील कर्मचाऱ्यांना हाताशी धरून या तीन वाहिन्यांनी हा गैरप्रकार केल्याचे उघड झाले. जून महिन्यात आरोपींचा यातील सहभाग निश्‍चित झाल्यानंतर दोन कर्मचाऱ्यांना हंसा कंपनीने काढून टाकले होते. या बनावट टीआरपी विरोधात हंसा कंपनीने गुन्हा नोंदवल्यानंतर दोन आरोपींना काल चौकशीसाठी बोलावले होते. या दोघांनी चौकशीत हे बनावट टीआरपीच्या रॅकेटची कबुली दिली. त्यानुसार मुंबई पोलिसांच्या पथकाने दोघांना अटक केली होती. 

रिपब्लिक टीव्ही बरोबरच फक्त मराठी आणि बॉक्‍स ऑफिस हे दोन चॅनेल्ससुद्धा बनावट टीआरपी प्रकरणात अडचणीत आले आहेत. फक्त मराठी आणि बॉक्‍स ऑफिस चॅनेलच्या मालकांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, रिपब्लिक टीव्हीच्या व्यवस्थापनाची चौकशी करून पुढील कारवाई पोलीस करणार आहेत. मुंबईतील तब्बल 1800 घरामध्ये दर महिन्याला 400 ते 500 रुपये देऊन हे चॅनेल्स चालू ठेवावेत, असे सांगण्यात आले होते. टीआरपी वाढवण्यासाठी हा गैरप्रकार करण्यात आला. 

Edited by Sanjay Jadhav 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com