खळबळजनक : रेणू शर्माच्या वकिलाला दर दोन मिनिटाला धमकीचा कॉल - renu sharma lawyer ramesh tripathi claims he received threat calls | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पूजा चव्हाण मृत्यप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा

खळबळजनक : रेणू शर्माच्या वकिलाला दर दोन मिनिटाला धमकीचा कॉल

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 15 जानेवारी 2021

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात एका तरूणीने  बलात्काराची तक्रार पोलिसांकडे केली आहे. यावरून मोठा गदारोळ सुरू आहे.   

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात रेणू शर्मा नावाच्या तरूणीने बलात्काराची तक्रार पोलिसांकडे केली आहे. या तरुणीच्या वकिलाला धमक्या येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. 

या प्रकरणावर धनंजय मुंडे यांनी खुलासा केला होता. तक्रारदार तरुणी रेणू शर्माची बहीण करुणा शर्मा  हिच्याशी माझे संबंध होते आणि मला तिच्यापासून दोन मुले आहे, असे मुंडेंनी स्पष्ट केले होते. आता रेणू शर्मा यांचे वकील रमेश त्रिपाठी यांना धमक्या येत असल्याचे समोर आले आहे. त्यांनीच याबद्दल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. 

त्रिपाठी म्हणाले की, मला काल संध्याकाळी साडेसात वाजल्यापासून  धमक्या येत आहेत.दर दोन मिनितांनी मला धमकीचा फोन येतोय. मी या प्रकरणी सहाय्यक पोलीस आयुक्तांशी संपर्क साधला असून, मी उद्या पोलिसांसमोर जबाब नोंदवण्यास जात आहे. उद्या 11 वाजता पोलिसांकडे गेल्यानंतर सगळ्या गोष्टींचा खुलासा केला जाईल. 

हा हनी ट्रॅप नाही, असे सांगून ते म्हणाले की, आमच्या अशिलाने हनी ट्रॅप करण्याचा प्रयत्न केला असा आरोप होत आहे पण असं काहीही केलेलं नाही. हे आरोप मूळ गुन्ह्याला बगल देण्यासाठी केले जात आहेत.  माझ्यावर एका खोटा गुन्हा दाखल करुन आरोप करण्यात आलेत. हे खोटे आरोप आहेत. जबरस्ती कोणाला त्रास देण्याचा माझ्या अशिलाचा हेतू नाही.

या प्रकरणी पुरावे आम्ही पोलीस आणि न्यायालयाला देऊ. धनंजय मुंडे यांच्या पत्नीच्या खटल्याशी आमचा काहीही संबंध नाही. दोघी सख्ख्या बहिणी असल्या तर माझ्या अशिलावरील बलात्कार प्रकरणाचा त्या खटल्याशी काही संबंध नाही. काल माझ्या अशिलाने जबाब नोंदवला आहे. उद्या बाकीचा उरलेला जबाब नोंदवला जाईल. आमच्या अशील उद्या सगळं तुमच्या समोर मांडतील. मूळ मुद्दा बाजूला सारण्यासाठी इतर गोष्टी बोलल्या जात आहेत, असे त्रिपाठी यांनी सांगितले.  

हे प्रकरण सोडण्यासाठी माझ्यावर धमक्या देऊन दबाव टाकला जातोय. मला दोनशेच्या वर धमक्या आल्या आहेत. वकिलाला घाबरवण्यापेक्षा न्यायालयात तुमचा गुन्हा खोटा ठरवा. गृहमंत्री आणि सहाय्यक पोलीस आयुक्तांकडे मी तक्रार केली आहे. मला धमकीचे कॉल येत आहेत. ताकदवान लोकांच्या विरोधात लढताना वेळ जातोच. काल साडेचार तास जबाब नोंदवण्यात आला नव्हता. न्यायालयाकडून आम्हाला न्याय मिळे, असे त्रिपाठी यांनी नमूद केले. 

रेणू शर्मा यांनी डीएन नगर पोलीस ठाण्याला काल (ता.14) भेट दिली होती. या वेळी त्यांनी सहायक पोलिस आयुक्तांसमोर जबाब नोंदविला होता. त्यावेळी रेणू शर्मा यांच्या वकील  रमेश त्रिपाठी उपस्थित होते. आता रमेश त्रिपाठी यांनाच धमक्या येत असल्याने खळबळ उडाली आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख